वाकडेवाडीत दीड वर्षांपासून पथदिवे बंद

हरीश शर्मा 
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पुणे ः वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट ते अंडी उबवणी चौकापर्यंत सेवा रस्त्यावरील दोन्ही बाजूंचे पथदिवे मागील दीड वर्षांपासून बंद आहेत. याठिकाणी रोजच अपघात होत असून, महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. "सकाळ'ने याबाबत विचारणा केली असता, अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवीत हात वर केले. त्यामुळे महापालिकेचा गैर कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला

पुणे ः वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट ते अंडी उबवणी चौकापर्यंत सेवा रस्त्यावरील दोन्ही बाजूंचे पथदिवे मागील दीड वर्षांपासून बंद आहेत. याठिकाणी रोजच अपघात होत असून, महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. "सकाळ'ने याबाबत विचारणा केली असता, अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवीत हात वर केले. त्यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, येत्या चोवीस तासांत येथील पथदिवे सुरू करून देतो, असे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. 

पुणे-मुंबई मार्गावरील अंडी उबवणी चौकापासून थेट पाटील इस्टेटपर्यंत बीआरटी प्रशासनाच्या वतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूस मार्च 2017 मध्ये सेवा रस्त्याचे काम सुरू केले होते. ते काम एप्रिल 2018 मध्ये पूर्ण करून सेवा रस्ता व सायकल मार्ग तयार करण्यात आला. सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूला पथदिवे बसवण्यात आले. या गोष्टीला एक वर्षाचा कालावधी होऊन गेल्यानंतरही या रस्त्यावरील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. या रस्त्याला लागूनच अनेक सोसायट्या आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी पूर्ण काळोख पसरलेला असतो. दोन्ही बाजूने वाहने जोरात येत असल्याने रात्रीच्या वेळी सोसायटीमधून सेवा रस्त्यावर येताना अनेकदा अपघात होतात. अनेक वेळा येथील नागरिकांनी महापालिकेकडे याबाबत तक्रार करूनही पथदिवे फक्त वीजजोडणीसाठी बंद आहेत. 

येथील पथदिवे एक वर्षापासून फक्त वीजजोडणीसाठी बंद आहेत. पथदिवे विभागाने रस्ता खोदून जोडणी न दिल्यामुळे हे काम रखडले होते, पण आता ताबडतोब माणसे पाठवून काम सुरू करतो. उद्या दुपारपर्यंत कुठल्याही परिस्थितीत येथील दोन्ही मार्गांवरील पथदिवे सुरू करण्याचे प्रयत्न करू. - अशोक केदारी, कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग, औंध क्षेत्रीय कार्यालय, 

""मी आमच्या विभागातील अधिकाऱ्यांकडून वीजजोडणीचे काम त्वरित करून घेतो. येत्या चोवीस तासांत येथील सर्व पथदिवे सुरू करून देऊ.'' - योगेश माळी, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका. 

""येथील सेवा रस्त्यावरील पथदिवे उभारणीपासून सुरूच करण्यात आले नाही. मुख्य रस्त्यावरील पथदिवे चालू आहेत. मी पाठपुरावा करून सांगते.'' - सोनाली लांडगे, स्थानिक नगरसेविका, पुणे महापालिका 

पथदिवे बंद असल्याने रहिवाशांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेक अपघातही झाले आहेत.'' - 
-अब्रार काझी, सामाजिक कार्यकर्ते, कोहिनूर इस्टेट. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal corporations irresponsibility