एमआयटी संस्थेला महापालिकेची नोटीस; नागरिकांनी रोखले टेकडीवरील खोदकाम

जितेंद्र मैड
Thursday, 19 November 2020

श्रीराम हाईटस, वैदेही, सुफल सोसायटी यांच्या मागील बाजूच्या दोन्ही टेकडीवर खोदकाम, वृक्षतोड व कच्चा रस्ताबांधणी काम सुरु आहे. यासंदर्भात वरील तिन्ही सोसायट्या व अलंकापुरी, किस्मत सोसायटीमधील रहिवाशांनी वृक्षप्राधिकरण तसेच पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले होते.

कोथरुड : कोथरुडमधील स.नं. १२३ येथील डोंगर उतारावर एमआयटी संस्थेकडून सुरु असलेल्या मुरुम, माती डंपिंग कामाला स्थानिक रहिवाशांनी विरोध करत काम रोखले. नागरिकांनी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एमआयटी संस्थेला नोटीस बजावली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनिरूध्द खांडेकर म्हणाले की, ''श्रीराम हाईटस, वैदेही, सुफल सोसायटी यांच्या मागील बाजूच्या दोन्ही टेकडीवर खोदकाम, वृक्षतोड व कच्चा रस्ताबांधणी काम सुरु आहे. यासंदर्भात वरील तिन्ही सोसायट्या व अलंकापुरी, किस्मत सोसायटीमधील रहिवाशांनी वृक्षप्राधिकरण तसेच पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले होते. वारंवार तक्रार करुनही दुर्लक्ष होत असल्याने आम्ही जन आंदोलन करण्याची भूमिका घेतली. त्याची दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एमआयटीला नोटीस दिली आहे. परंतु त्यावर आम्ही समाधानी नाही. कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.'' 

 पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''आम्ही यासंदर्भात महापालिकेचे अधिकारी व तलाठी कार्यालयात तक्रार केली होती. परंतु कोरोनाच्या नावाखाली कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सुतारदरा, किष्किंधानगर या भागातही टेकडीची लचकेतोड राजरोसपणे सुरु आहे. लोकांनी आंदोलन केल्यावर नोटीस पाठवत असतील तर अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेबद्दल व निष्ठेबद्दल प्रश्न निर्माण होतो.''
- हर्षवर्धन मानकर, दिवा प्रतिष्ठान, अध्यक्ष

''कोणतीही रीतसर परवानगी न घेता येथे वृक्षतोड, टेकडीफोड चालू असल्याचे आमच्या लक्षात येताच आम्ही तक्रार दाखल केली. परंतु त्याची म्हणावी अशी दखल न घेतल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले.''
- संदीप भडकमकर, रहिवासी

''आम्ही संबंधितांना नोटीस दिली आहे. यात जर कुठे अनियमितता असेल तर कायदेशीर कारवाई केली जाईल.''
- सदीप कदम, सहाय्यक आयुक्त, ​कोथरुड क्षेत्रीय कार्यालय.

याबाबत, एमआयटी संस्थेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal notice to MIT and Excavation on the hill was stopped by civilians