महापालिका १५ दिवसांत अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर मांडणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

जबाबदारी कोणाची
महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. त्यांच्याकडे नागरिकांनी कामे सुचवायची आहेत. क्षेत्रीय कार्यालयांकडून स्थापत्य विभागामार्फत लेखा विभागाकडे माहिती येते. स्थापत्य विभागामार्फत रस्ते विकास, नदी, रेल्वेमार्गावर पूल उभारण्याची कामे केली जातात. तसेच रस्ते, पदपथ उभारणे, गटारे किंवा सांडपाणी वाहिन्या टाकणे यासह शाळा, वाचनालये, दवाखाने, व्यायामशाळा, व्यापारी संकुले, नाट्यगृहे, जलतरण तलाव आदी विषयही स्थापत्य विभागाच्या कक्षेत येतात.

पिंपरी - नागरिकांना त्यांच्या मनासारख्या सुखसोई मिळाव्यात आणि अर्थसंकल्पात त्यांचा सहभाग असावा, यासाठी पालिकेने शहरातील नागरिकांना दहा लाख रुपयांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन सहा महिन्यांपूर्वी केले होते. त्याची मुदत संपली असून, अर्थसंकल्प तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंधरा दिवसांत तो स्थायीसमोर मांडला जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयुक्त व ‘स्थायी’चा भर
सरत्या आर्थिक वर्षात झालेली कामे, खर्च झालेला निधी आणि आगामी आर्थिक वर्षात करायची कामे, त्यासाठी लागणारा निधी, याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी सर्व विभागप्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. त्यात शहराच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करणे, प्रलंबित पवना जलवाहिनीचे काम, पाण्याच्या नवीन स्रोतासाठी भामा-आसखेड व आंद्रा धरण पाणी योजना, केंद्र सरकारच्या ‘अमृत’ व ‘चोवीस बाय सात’ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेली जलवाहिन्यांची कामे, पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविणे, स्मार्ट सिटीबरोबरच अन्य भागांत अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट योजना राबविणे, बीआरटी प्रकल्प, समाविष्ट गावांमध्ये रस्ते आदींसह स्थापत्यविषयक प्रकल्प व त्यासाठी लागणारा निधी, यावर चर्चा झाली. कामे व निधी यांचा मेळ घालण्यासाठी सर्व विभागांनी उत्पन्नवाढीवर भर देण्याचा आदेश हर्डीकर यांनी दिला आहे. तर, चालूक वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांसाठी किती निधी लागणार, कोणती कामे राहिली. याची माहिती मडिगेरी यांनी मागितली आहे.

क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आलेली माहिती संबंधित विभागांकडे जाईल. त्यांची छाननी होऊन कामांचा समावेश केला जाईल व ती माहिती स्थापत्यकडून लेखा विभागाकडे येईल. येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन कामांचा समावेश अर्थसंकल्पात केला जाईल. 
- जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखाधिकारी, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipality will present the budget before the Standing Committee within 15 days