
सिंहगड रस्त्याच्या अर्धवट कामाचा नागरिक-पर्यटकांना मन:स्ताप..!
किरकटवाडी : सिंहगड रस्त्याच्या नांदेड सिटी गेट जवळील सिटी पॉईंट हॉटेल समोर अर्धवट असलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, नोकरदार, व्यावसायिक व पर्यटकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावर असलेल्या सुमारे दहा मीटर लांबी व दोन फूट खोल पाणी साठलेल्या खड्ड्यातून नागरिकांना वाट काढावी लागत असल्याने अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झाले आहेत.तसेच वाहनांचेही नुकसान होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नांदेड सिटी गेट पासून पुढे सिंहगड रस्त्याचे काम केले आहे मात्र मधेच सुमारे दहा मीटर लांबीचे काम अर्धवट ठेवले आहे. सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यात पाणी साचत असून निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरुप आले आहे. याच खड्ड्यात तुंबलेले उघडे चेंबर असल्याने त्यात दुचाकी अडकून अपघात होत आहेत. अनेक महिला व पुरुष यामध्ये जखमी झाले असून या ठिकाणी तातडीने काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
"दोन-तीन वेळा माझी दुचाकी या पाण्यातील चेंबरमध्ये अडकली होती. मुख्य सिंहगड रस्त्याची ही दयनीय अवस्था प्रशासनाला दिसत नाही का? काही तरी करुन पाणी काढून देण्याची व्यवस्था करण्यात यावी किमान खड्डे तरी दिसतील."
- योगिता बागणीकर, नागरिक,किरकटवाडी.
"खड्ड्यामुळे सतत वाहतूक कोंडी होत आहे. भर पावसात नागरिक वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. शनिवार व रविवारी तर स्थिती अत्यंत गंभीर असते."
-आशिष देडगे, नागरिक, नांदेड गाव.
"एकदा या खड्ड्याच्या बाजूला व एकदा अगदी खड्ड्यावर अशी दोन वेळा मोठी वडाची झाडे पडली आहेत. सुदैवाने कोणाला काही दुखापत झाली नाही. वाहतूक कोंडीच्या वेळी झाड पडले असते तर गंभीर दुर्घटना घडली असती."
- रमेश करंजावणे, नागरिक,किरकटवाडी.
" वर वीजेची तार असल्याने रस्त्याचे काम केल्यास रस्त्याची उंची वाढेल व वाहने तारेला लागतील. वीज वाहिनी भुमिगत केल्याशिवाय रस्त्याचे काम करणे शक्य नाही त्यामुळे येथील काम रखडले आहे. मी स्वतः जाऊन पाहणी केली आहे, पाणी काढून देण्यासाठीही जागा नाही. काहीतरी करुन पाणी काढून देण्याचा प्रयत्न आहे."
- आर.वाय.पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
Web Title: Municipality Work Pending Near Nanded City Citizen Face Problem Hit Tourism Cause Accident Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..