esakal | धक्कादायक! सिगारेटचे पैसे मागितल्याने केला पानटपरीचालकाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime

बाणेर येथे सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन पानटपरीचालकावर तिघांनी कोयत्याने वार करुन त्याचा खुन केला.

धक्कादायक! सिगारेटचे पैसे मागितल्याने केला पानटपरीचालकाचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन पानटपरीचालकावर तिघांनी कोयत्याने वार करुन त्याचा खुन केला. हा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास बाणेर येथील डिमार्टसमोरील पानटपरीवर घडला. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. 

अभिषेक कोर्डे (वय 21, रा. रामकृष्ण मंगल कार्यालय, ओंकार कॉलनी, म्हाळुंगे), सोमनाथ कल्याण चतुर (वय 21, रा. म्हाळुंगे) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर संतोष नरहरी कदम (वय 32, रा.म्हाळुंगे) असे खुन झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. याप्रकरणी रामप्रभु मोटे (वय 39, रा. म्हाळुंगे) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बाणेरमधील डिमार्टसमोर करण नावाचे हॉटेल आहे.या हॉटेलच्या शेजारीच फिर्यादी यांचा भाचा संतोष कदम याची "स्वरा' या नावाने पानटपरी आहे. फिर्यादी संतोष याच्या पानटपरीवर दुपारी अडीच वाजता आले होते. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी संतोषच्या पान टपरीतुन तीन सिगारेट घेतल्या. त्यानंतर संतोषने त्यांच्याकडे पैसे मागितले. त्यावेळी " तु आमच्याकडे पैसे मागतोस, तुला माहिती आहे का आम्ही कोण आहोत ते, आम्ही भाई आहोत इथले' अशा शब्दात दम दिला. त्यावेळी एकाने संतोष यांच्या कानाखाली लगावली.

त्यानंतर फिर्यादी यांनी मध्यस्थी करुन त्यांची समजूत काढल्यानंतर ते तिघेजण तेथून निघून गेले. त्यानंतर ते तिघेजण सायंकाळी सव्वा पाच वाजता पुन्हा संतोषच्या टपरीवर आले. त्यावेळी संतोष आणि त्यांची सासू गोदावरी मोटे यांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी फिर्यादी बाहेर गेले. तेव्हा दुपारी भांडण झालेल्या तिघांपैकी दोघांनी संतोषचे हात पकडून ठेवले होते. तर त्यांच्यापैकी एकाने धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले.

 फिर्यादी संतोषला वाचविण्यासाठी गेले, तेव्हा दुसऱ्या आरोपीने कोयत्याने फिर्यादीवर वार केले. त्यानंतर आरोपी त्यांच्या दूचाकीवर बसून पळून गेले. दरम्यान संतोष गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री दहा वाजता त्याचा मृत्यु झाला.

loading image
go to top