प्रभाग समितीच्या स्वीकृत सदस्याकडून खुनी हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

विजय रणसुरे यांच्यावर खुनी हल्ला केलेल्या चौघांपैकी राकेश चौरे, बापू खरात, गणेश मोरे या तिघांना रात्रीच अटक केली. तर स्वप्नील कांबळे हा फरारी असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल.
- युनूस शेख, वरिष्ठ निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे

येरवडा - शास्त्रीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ चौघांनी विजय गणपत रणसुरे (वय ३२, रा. सुभाषनगर, नवी खडकी) यांच्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. हल्ला करणाऱ्यांमध्ये येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग समितीचा स्वीकृत सदस्य राकेश श्‍यामराव चौरे (रा. नवी खडकी) याचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फिर्यादी रणसुरे यांना त्यांचे मित्र व आरोपी नितीन ऊर्फ बापू खरात (वय ४३, रा. गणेशनगर) याने महत्त्वाचे काम सांगून शास्त्रीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ बोलावून घेतले. तेथे चौरे, गणेश मोरे (वय ३९, रा. गणेशनगर) व स्वप्नील ऊर्फ सन्नी कांबळे होते. ‘माझ्या पत्नीबरोबर बोलू नको, म्हणून किती वेळा सांगितले,’ असे सांगून चौरेने रणसुरेंच्या कानाशिलात लगावली. त्यानंतर हातातील कोयत्याने रणसुरे यांच्या डोक्‍यात वार केले. खरातनेही त्यांच्या खांद्यावर व उजव्या हातावर वार केले. मोरेने पुन्हा कोयत्याने त्यांच्या डोक्‍यात वार केले. तर कांबळेने जखमी अवस्थेत असलेल्या रणसुरेंना खाली पाडून लाथाबुक्‍यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनास्थळी येरवडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी भेट देऊन तत्काळ आरोपींच्या तपासासाठी पथके पाठविले. अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय वाघमारे करीत आहेत.

चौरे याची गेल्याच वर्षी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीचे स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली आहे. चौरेचे मामा बापू खरात हे गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murderer attack by an approved member of the ward committee