

नारायणगाव, ता. ५ : औषधी गुणधर्म असल्यामुळे आहारात मशरूमचा वापर करणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. कमी भांडवलात, कमी जागेत आळिंबी उत्पादन घेता येत असल्याने शेतीला पूरक व्यवसाय फायदेशीर आहे. म्हणून महिला शेतकरी, ग्रामीण युवक-युवती यांनी आळिंबी उत्पादन व्यवसाय करावा. आळिंबी उत्पादन व त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दिली जाईल, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी दिली.
कौशल्य विकास योजनेअंतर्गत ग्रामोन्नती मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे पाचदिवसीय ‘आळिंबी (मशरूम) लागवड तंत्रज्ञान’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील शेतकरी, महिला तसेच आळिंबी उत्पादक सहभागी झाले होते.
यावेळी केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, गृहविज्ञान शास्त्रज्ञ निवेदिता शेटे, कृषी विस्तार शास्त्रज्ञ राहुल घाडगे, अखिल भारतीय समन्वित आळिंबी संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. गायकवाड, मशरूम उत्पादक अमर पडवळ, आकाश शिंगोटे, रोहिणी गटकळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी गावडे म्हणाले की, आळिंबीचा मानवी आहारात समावेश केल्यास प्रतिकारशक्ती वाढते. आळिंबी कर्करोग, मधुमेह, हृदयविकारप्रतिबंधक असून लठ्ठपणापासून बचाव होतो.
शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. गायकवाड यांनी आळिंबी लागवडीच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन केले. धिंगरी आळिंबी लागवड जुलै ते फेब्रुवारीच्या दरम्यान करता येते. या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. शेतीच्या पिकातील काडीकचरा, पाला-पाचोळा व पिकाचे वेगवेगळे अवशेष वापरून धिंगरी आळिंबीचे उत्पादन घेता येते. कमी उत्पादन खर्च व जास्त बाजारभावामुळे आळिंबी उत्पादनामधून चांगला नफा मिळू शकतो.
गृहविज्ञान शास्त्रज्ञ निवेदिता शेटे म्हणाल्या की, आळिंबीच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य केले जाईल. यावेळी त्यांनी आळिंबीपासून उप-उत्पादनांचे (लोणचे, नूडल्स, पावडर इ.) प्रात्यक्षिक करून दाखवले. यानिमित्त आळिंबी उत्पादक रोहिणी गटकळ, अशोक कुराडे यांच्या फार्मवर प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
08860
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.