गटारीसाठी आणली 19 बकरे अन् चोरट्यांनी मारला डल्ला

निलेश बोरुडे
Monday, 20 July 2020

अकिल शेख (रा. पानशेत) असे त्या 45 वर्षीय मटण विक्रेत्याचे नाव असून त्याचा खानापूर येथे मटण विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी 'गटारी'च्या निमित्ताने जास्त प्रमाणात मटन विक्री होईल या हेतूने त्यांनी आठवड्यापूर्वी बकऱ्यांची खरेदी करून ठेवली होती.

किरकटवाडी: खानापूर ता. हवेली येथील एका मटन विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने 'गटारी'साठी विक्रीस आणलेल्या 19 बकऱ्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यावसायिकाला यामुळे सुमारे दीड लाखांची झळ बसली आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अकिल शेख (रा. पानशेत) असे त्या 45 वर्षीय मटण विक्रेत्याचे नाव असून त्याचा खानापूर येथे मटण विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी 'गटारी'च्या निमित्ताने जास्त प्रमाणात मटन विक्री होईल या हेतूने त्यांनी आठवड्यापूर्वी बकऱ्यांची खरेदी करून ठेवली होती. बकरे आणल्यापासून पुन्हा लॉकडाऊन झाल्याने सर्व बकरे दुकानातच होती. शेख रोज सकाळ संध्याकाळ त्यांना चारापाणी करून जात असत. रविवारी प्रशासनाकडून सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने उघडी  ठेवण्यासाठी सवलत दिल्याने व योगायोगाने 'गटारी' असल्याने शेख सकाळी दुकान उघडण्यासाठी खानापूर येथे आले. समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. दुकानाचे कुलूप तुटलेले होते व दरवाजा उघडा होता. विक्रीसाठी आणलेली सर्व बकरे चोरीला गेली होती. अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेख यांना या दुर्दैवी घटनेमुळे खूप मोठा धक्का बसला आहे. याबाबत हवेली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे अकिल शेख यांच्याकडून सांगण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता,"या घटनेची माहिती मिळताच खानापूर परिसरातील रस्त्याला लागून असलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. संबंधित व्यावसायिक तक्रार देण्यासाठी अजून आलेले नाहीत; परंतु तरीही तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून याबाबत गोपनीय माहिती मिळवली जात आहे. माहितीच्या व्यक्तींनी ही चोरी केलेली असावी अशी प्रथमदर्शनी शक्यता जाणवत आहे. नागरिकांना याबाबत काही माहिती मिळाल्यास हवेली पोलिस स्टेशनची संपर्क साधावा,"अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutton seller bought 19 goats were theft by thieves