होय, मटणाची विक्री झाली तब्बल दीड हजार किलो...

प्रा. प्रशांत चवरे
Tuesday, 10 March 2020

- मासळीची धुळवड

भिगवण : धुळवडीचा मुहूर्त साधत मंगळवारी (ता.१०) स्थानिक खवय्यांनी मटण व मासळीची जोरदार खरेदी केली. येथील मटण मार्केटमध्ये सुमारे दीड हजार किलो मटण तर मासळी बाजारात एक हजार किलो मासळीची विक्री झाली. कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवत चालू वर्षी मासळी व मटण खरेदी प्राधान्य दिल्यामुळे मटण व मासळीच्या विक्रीमध्ये सुमारे वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भिगवण येथील मटण व मासळीचे मार्केट हे पुणे-सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. खवय्यांचा आवडत्या मंगळवारी धुळवड आल्यामुळे खवय्यांनी मटण व मासळीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सकाळपासून मटण व मासळीच्या मार्केटमध्ये ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला सेवा रस्त्यावर असलेल्या मटण मार्केटमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे सकाळी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. येथील मटण मार्केटमध्ये सुमारे 150 बकरींच्या मटणाची म्हणजेच सुमारे दीड हजार किलो मटणाची दुपारपर्यंत विक्री झाली होती. वाढलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली होती. मटण विक्रेत्यांनी आजच्या दिवसांसाठी खास तयारीही केली होती. 

कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच राशीन रोडवरील मासळी बाजारामध्येही ग्राहकांनी मासळी खरेदीसाठी गर्दी केली होती. या ठिकाणाहून स्थानिक खवय्याने मासळीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. खरेदीसाठी भिगवण शहरातील ग्राहकांबरोबरच परिसरातील ग्राहकही येथे आल्याचे दिसत होते. मंगळवारी सकाळी सुमारे एक हजार किलोपेक्षा अधिक मासळी स्थानिकांनी खरेदी केली असल्याचे येथील मासळी व्यावसायिकांनी सांगितले.

सध्या मासळीची आवक कमी असल्यामुळे मासळीच्या दर चढे आहेत. आज धुळवडीच्या दिवशीही दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. मटण व मासळी मार्केटबरोबरच धुलवडीसाठी येथील मांसाहारी हॉटेलही सज्ज ठेवण्यात आली होती. येथील माशांची विशिष्ट चव बनविण्याच्या वेगळ्या पध्दतीमुळे स्थानिक ग्राहकांसह बारामती, पुणे व इतर भागातील ग्राहकही खास भिगवणची मासळी खाण्यासाठी येथे भेट देत असतात.

याबाबत येथील मत्स्य व्यापारी ज्ञानेश्वर नगरे म्हणाले, चालू वर्षी कोरोना व्हायरसचा परिणाम दिसून येतो. ग्राहकांनी चिकनच्या ऐवजी मासळी व मटण खरेदीस प्राधान्य दिल्यामुळे मटण व मासळीच्या विक्रीमध्ये वाढ झाली. दरांमध्येही थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले. दरवर्षीपेक्षा वीस ते पंचवीस टक्क्यांनी धुलवडीच्या दिवशीच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutton Sold of One and Half Thousand Kilos in Bhigwan