ढेबेवाडी पिढ्यानपिढ्यांचा  भक्तीचा प्रवास बैलगाड्यातून

ढेबेवाडी पिढ्यानपिढ्यांचा भक्तीचा प्रवास बैलगाड्यातून

Published on

पिढ्यान् पिढ्या बैलगाड्यातून हाेताेय ‘भक्ती प्रवास’

नाईकबा यात्रेचे वेगळेपण कायम, जिल्ह्यातील भाविक कुटुंबीयांनी जपली परंपरा

राजेश पाटील : सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी, ता. २१ : गेल्या कित्येक पिढ्यांपासून चैत्रात होणाऱ्या श्री नाईकबा यात्रेत काळाच्या ओघात अनेक बदल होत गेले; पण एक परंपरा मात्र अखंड राहिली ती म्हणजे श्री नाईकबा देवाच्या दर्शनासाठी कुटुंबीयांसह बैलगाड्यामधून येण्याची. विविध जिल्ह्यातील अनेक भाविक कुटुंबांनी पिढ्यान् पिढ्या भक्तिभावाने जपलेली ही परंपरा आजही यात्रेदरम्यान बघायला मिळते.
दुचाकी, बस, कार, जीप, टेंपोसह विविध वाहनांच्या सुविधा उपलब्ध असतानाही श्री नाईकबा देवाच्या दर्शनासाठी कुटुंबीयांसह बैलगाड्यामधून येण्याची पिढ्यान् पिढ्यांची परंपरा विविध जिल्ह्यांतील अनेक भाविक कुटुंबांनी आजही भक्तिभावाने जपली आहे. प्रतिवर्षी श्री नाईकबा यात्रेच्या दोन दिवस आधीपासूनच हा उत्साही वातावरणातील भक्तीचा प्रवास श्री नाईकबाच्या मार्गावर दिसून येतो, ताे आजही अनुभवायला मिळाला. बनपुरी येथील श्री क्षेत्र नाईकबा देवाच्या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातून भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. सोमवारी (ता. २३) ‘श्रीं’च्या नैवेद्याचा दिवस असून, मंगळवारी (ता. २४) पालखी सोहळा होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना विविध आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यात्रा शांततेत व नियोजनबद्ध होण्यासाठी पोलिसांसह प्रशासन सज्ज झाले आहे. या यात्रेसाठी बैलगाड्यातूनही भाविक येतात. यात्रेआधी दोन दिवस बैलगाड्या दाखल व्हायला सुरुवात होते. आज सकाळपासून हा ओघ वाढला होता. डोंगर पायथ्याला जानुगडेवाडीजवळ शिवारात सावली गाठून बैलगाड्यातून आलेल्या भाविकांचा मुक्काम आहे. तेथून नैवेद्याच्या दिवशी बैलांना सजवून वाजत गाजत मंदिराकडे नेले जाते. भादोले (कोल्हापूर), आष्टा (सांगली) आदी गावातून श्री नाईकबा यात्रेसाठी बैलगाड्या येण्याचे प्रमाण जास्त आहे. गाड्यांसमवेत आलेल्या भाविकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘पाडव्याला दुपारी गाड्या यात्रेसाठी रवाना होतात. एका गाडीबरोबर चार- पाच जण असतात. या मोठ्या प्रवासाला निघण्यापूर्वी १५ दिवस आधीच बैलांची तयारी करून घ्यावी लागते. सरकी, भरडा, पेंड असा पौष्टिक आहार त्यांना खायला द्यावा लागतो. सोबत आवश्यक स्वयंपाकाचे साहित्य, तसेच बैलांचा चारा, भरडा सोबत घेऊन आम्ही निघतो. कामेरी व कोळेवाडी असे दोन मुक्काम रस्त्यात होतात. दरम्यान, सजवलेल्या बैलगाड्या आणि त्याला जुंपलेली झुली घातलेले व रंगवलेले बैल परिसरात दाखल होताच ठिकठिकाणी यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले.

--------------------
अनेक पिढ्यांपासून हा भक्तीचा प्रवास सुरू आहे. काळाच्या ओघात बैलगाड्यांची संख्या कमी झाली असली, तरी भाविकांचा हा वैशिष्ट्यपूर्ण प्रवास आजही अस्तित्व टिकवून आहे आणि पुढेही तो सुरूच राहील असा विश्वास आहे.
तानाजी पाटील- भादोले (कोल्हापूर)

--------------------------------

Marathi News Esakal
www.esakal.com