बारामतीच्या पोलिसांकडून धडाडीच्या कामगिरीची अपेक्षा

मिलिंद संगई
Friday, 6 November 2020

नामदेव शिंदे यांनी अवैध सावकारांविरुध्द मोहिम हाती घेतली असून महेश ढवाण यांनीही गुंडगिरी, अवैध व्यवसाय चालू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

बारामती : येथील शहर पोलिस ठाण्यामध्ये नामदेव शिंदे तर तालुका पोलिस ठाण्यामध्ये महेश ढवाण या दोन धडाडीच्या अधिका-यांची नियुक्ती झाल्यानंतर आता बारामतीचे वातावरण बदलणार अशी लोकांना अपेक्षा आहे. 

बारामती शहर व तालुका ही दोन्ही पोलिस ठाणी पुणे जिल्ह्यामध्ये संवेदनशील समजली जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विधानसभा मतदारसंघ व त्यांचे बारकाईने लक्ष असल्याने या पोलिस ठाण्याच्या कामकाजाकडे वरिष्ठ अधिका-यांचेही बारकाईने लक्ष असते. बारामती शहरात वाहतूकीची तर तालुक्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांची समस्या आहे. अनेकदा अतिरिक्त तसेच पोलिस अधीक्षकांच्या पथकाने या दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घुसून कारवाया केल्या आहेत. पोलिसांना या बाबींची कल्पना नव्हती असे नव्हते, मात्र आशिर्वादानेच हे व्यवसाय सुरु राहत होते. 

नामदेव शिंदे यांनी अवैध सावकारांविरुध्द मोहिम हाती घेतली असून महेश ढवाण यांनीही गुंडगिरी, अवैध व्यवसाय चालू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. बारामती शहर व तालुक्यातही सावकारीसह, दारु, मटका, जुगारासह वाळू व इतरही बाबींचा उपद्रव आहे. मोटारसायकल चोरींचे प्रमाण ही एक समस्या असून शहरात एमआयडीसीसह काही भागात मुलींची व महिलांना होणारा त्रास हाही एक महत्वाचा विषय या दोन्ही अधिका-यांकडून हाताळला जाणार आहे. 

बारामती शहर पोलिस ठाणेचे पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे म्हणाले, सावकारीसह इतर कोणत्याही बाबतीत दमदाटी, दादागिरी होत असेल तर बारामतीकरांनी निर्भयपणे पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांची मदत घ्या. पोलिस नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून त्यावर योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल.  

बारामती तालुका पोलिस ठाणेचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण म्हणाले, कायदा हातात घेऊन गुंडगिरी किंवा दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. कोणीही कसलाही त्रास देत असेल तर लोकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिस आपल्या स्तरावर कारवाई करतीलच. मात्र लोकांनीही पुढाकार घेत थोडे धाडस दाखवणे गरजेचे आहे.  

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Namdev Shinde has been posted in Baramati city police station and Mahesh Dhawan in taluka police station