काँग्रेसने जागतिक कार्यक्रमाला आखाडा बनवले

काँग्रेसने जागतिक कार्यक्रमाला आखाडा बनवले

Published on

काँग्रेसने जागतिक कार्यक्रमाला आखाडा बनवले

पंतप्रधान मोदी यांची टीका; नमो भारत कॉरिडॉरचे लोकार्पण

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २२ ः‘‘एआय परिषदेच्या निमित्ताने ८० हून अधिक देशातील लोक दिल्लीत आले होते. दुसरीकडे काँग्रेसच्या परिसंस्थेने काय केले? तर एका जागतिक कार्यक्रमाला या पक्षाने आपल्या नग्न आणि गलिच्छ राजकारणाचा आखाडा बनवले,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मेरठमध्ये झालेल्या ‘नमो भारत कॉरिडॉर’च्या उद्‍घाटनप्रसंगी आयोजित जाहीर सभेत बोलताना केली.

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-२०२६’ दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंगातील सदरे काढून केलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार तोफ डागली. ‘‘देशाला विकसित करण्यासाठी लोक झटत आहेत, तर दुसरीकडे काही राजकीय पक्षांना देशाचे हे यश पचत नाही. भाजपने नेहमी विकासाच्या कामांना प्राथमिकता दिली. ‘नमो भारत कॉरिडॉर’ हे त्याचे उदाहरण आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी त्यांचे विषारी राजकारण सोडावे, असे आवाहन यापूर्वी मी मागील तीन लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात करताना केले होते. ज्या कामांचे भूमीपूजन आम्ही करतो, ती कामे पूर्णही आम्हीच करतो. पूर्वीप्रमाणे योजना आता अटकत, लटकत आणि भटकत नाहीत,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 
‘देशावरचे ओझे’
एआय परिषद हा भाजपचा नव्हे तर देशाचा कार्यक्रम होता. मात्र काँग्रेसवाल्यांनी सर्व मर्यादा सोडल्या. काँग्रेस नेत्यांच्या वागण्यावर देशभरातून टीका होत असली तरी हे लोक सुधारण्यास तयार नाहीत, असे मोदी म्हणाले. ‘‘काँग्रेस पक्ष हे देशावरचे ओझे बनला आहे. काही महिला खासदारांना खुर्चीवर कब्जा करण्यासाठी पाठवल्यामुळे तुम्ही पंतप्रधान होणार नाही. देशातील सर्वांत मोठा पक्ष किती दिवाळखोरीत गेला आहे, दरिद्री झाला आहे, हे सर्वांना पहावयास मिळाले आहे. आपल्याच देशाला हे लोक बदनाम करण्यासाठी निघाले आहेत,’’ असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.
शाळकरी मुलांशी संवाद
पंतप्रदान मोदी यांनी वेगवान रेल्वेतून शाळकरी मुलांसोबत प्रवास करत त्यांच्याशी संवाद साधला. शताब्दी नगर पासून मेरठ दक्षिण स्थानकापर्यंत त्यांनी हा प्रवास केला. मोदी यांच्या हस्ते मेरठ शहरातील १२ हजार ९३० कोटी रुपये खर्चाच्या विविध योजनांचे उद्‍घाटन झाले. नमो भारत कॉरिडॉरमुळे दिल्ली ते मेरठ ही शहरे वेगवान रेल्वेने जोडली जाणार आहेत. साहिबाबाद, गाजियाबाद, मोदीनगर या शहरांसाठी लागणारा वेळही यामुळे वाचणार आहे.

चौकट
१८० किलोमीटर प्रतितास वेग
नमो भारत ही देशातील पहिली रिजनल रॅपिड ट्रान्झिट वाहतूक योजना आहे. १८० किलोमीटर प्रतितास या वेगाने या मार्गावर मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील सराय काले खां ते न्यू अशोक नगर तसेच मोदीपूरम ते मेरठ दक्षिण या मार्गांचे उद्‍घाटन करण्यात आले. ८२.१५ किलोमीटर लांबीच्या दिल्ली-मेरठ नमो भारत कॉरिडॉरमधील ७० किलोमीटरचे अंतर हे एलिव्हेटेड तर १२ किलोमीटरचे अंतर भूमीगत आहे. या प्रकल्पावर ३० हजार २७४ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com