

नांदेडला खरीप २०२३ मध्ये
१.७२ लाख पीकविमा दावे
----
स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकाअंतर्गत अर्ज; तीन वर्षानंतर परतावा मंजुरीची आशा
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ मध्ये नांदेड जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार ९१५ शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत नुकसानभरपाई मिळण्यासाठी दावे दाखल केले होते. जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांतून हे दावे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात राज्याच्या कृषी सचिवांनी विमा कंपनीचे अपील नुकतेच फेटाळले आहे. यामुळे या अर्जदार शेतकऱ्यांना विमा परतावा मंजुरीची आशा लागली आहे.
खरीप हंगाम २०२३ मध्ये अतिवृष्टी, प्रतिकूल हवामान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेअंतर्गत भरपाईसाठी दावे दाखल केले होते. यात मुखेड तालुक्यात सर्वाधिक २५ हजार ५० दावे दाखल झाले. त्यानंतर देगलूर तालुक्यात १७ हजार ९८५, माहूरमध्ये १५ हजार २८७, हदगावमध्ये १५ हजार २०२ आणि बिलोली तालुक्यात १५ हजार ३६१ दावे दाखल करण्यात आले होते. भोकर तालुक्यात १३ हजार ८५, कंधारमध्ये १२ हजार ३४५, मुदखेडमध्ये ९ हजार २६८, नांदेड तालुक्यात ९ हजार ६१३ आणि अर्धापूर तालुक्यात ८ हजार १८३ शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी दावे केले होते. तसेच लोहा तालुक्यात ६ हजार १४८, किनवटमध्ये ५ हजार ९७८, धर्माबादमध्ये ३ हजार ८८५, हिमायतनगरमध्ये २ हजार ९८७, उमरीमध्ये २ हजार ९७६ आणि नायगाव तालुक्यात ९ हजार ५६२ दावे दाखल झाले होते. दरम्यान पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती संदर्भात प्राप्त तक्रार अर्जदारांचे १०० टक्के विमा संरक्षीत क्षेत्र बाधित झाल्याचे गृहीत धरून तालुका कृषी अधिकारी यांनी गावनिहाय निश्चित केलेल्या किमान नुकसान टक्केवारीपेक्षा जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती, नांदेड यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील दाखल केले होते. यावरील सुनावणी पूर्ण होऊन कृषी सचिव तथा राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष परिमल सिंह यांनी अपील फेटाळले. त्यामुळे या दावेदार शेतकऱ्यांना परतावा मंजुरीची प्रतीक्षा आहे.
तालुकानिहाय दाव्यांची संख्या
मुखेड २५,०५०; देगलूर १७,९८५; बिलोली १५,३६१; माहूर १५,२८७; हदगाव १५,२०२; भोकर १३,०८५; कंधार १२,३४५; नांदेड ९,६१३; नायगाव ९,५६२; मुदखेड ९,२६८; अर्धापूर ८,१८३; लोहा ६,१४८; किनवट ५,९७८; धर्माबाद ३,८८५; हिमायतनगर २,९८७; उमरी २,९७६. एकूण दावे : १,७२,९१५.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.