

नांदेड विभागात ऊस
गाळप हंगामाला सुरुवात
----
२१ साखर कारखाने सुरू; आतापर्यंत ६.९८ लाख टन उसाचे गाळप
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : नांदेड विभागातील २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. मंगळवारपर्यंत (ता. २७) विभागातील २१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये नऊ सहकारी आणि १२ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ६ लाख ९८ हजार ३९९ टन उसाचे गाळप केले आहे. तर ४ लाख ३७ हजार ४७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ६.२६ टक्के नोंदविण्यात आला आहे.
साखर आयुक्तालयाच्या २७ ऑक्टोबरअखेरच्या गाळप अहवालानुसार, विभागात सहकारी कारखान्यांनी २ लाख ४५ हजार ४५० टन उसाचे गाळप करून १ लाख ४९ हजार ७६० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ६.१० टक्के आहे. दुसरीकडे, खासगी कारखान्यांनी ४ लाख ५२ हजार ९४८ टन उसाचे गाळप केले असून, २ लाख ८७ हजार ७१० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. खासगी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ६.३५ टक्के नोंदविण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात चार साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यामध्ये एका सहकारी आणि तीन खासगी कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५६ हजार ९० टन उसाचे गाळप झाले असून, ९० हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ५.८३ टक्के आहे. जिल्ह्यातील खासगी कारखान्यांनी एकूण १ लाख ३५ हजार २२० टन उसाचे गाळप केले असून, ८२ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सहकारी कारखान्याने २० हजार ८७० टन उसाचे गाळप करून ८ हजार ६५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. लातूर जिल्ह्यात नऊ कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, त्यात सहा सहकारी आणि तीन खासगी कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ७२ हजार ९०५ टन उसाचे गाळप झाले असून, १ लाख ८० हजार २६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ६.६१ टक्के आहे.
परभणी जिल्ह्यात पाच खासगी कारखान्यांनी १ लाख ८१ हजार ४६७ टन उसाचे गाळप करून १ लाख ९ हजार ८६० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. हिंगोली जिल्ह्यात तीन कारखान्यांनी ८७ हजार ९३७ टन उसाचे गाळप केले असून, ५६ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाल्याने विभागातील साखर कारखान्यांच्या कामकाजाला वेग आला आहे. आगामी काळात गाळपाचे प्रमाण आणि साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
कारखानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन (गाळप टनांत साखर उत्पादन क्विंटलमध्ये)
जिल्हा...कारखाने...ऊस गाळप...साखर उत्पादन
नांदेड...चार...१,५६,०९०...९०,९५०
लातूर...नऊ...२,७२,९०५...१,८०,२६०
परभणी...पाच...१,८१,४६७...१,०९,८६०
हिंगोली...पाच...१०,२१,८५८...०९,६५,७००
एकूण...२१...६,९८,३९९...४,३७,४७०
विभागाचा सरासरी साखर उतारा : ६.२५ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.