नंदेश्‍वर येथील दहावी परिक्षा केंद्रावर मराठीच्या पेपरला 10 परीक्षार्थी बोगस

नंदेश्‍वर येथील दहावी परिक्षा केंद्रावर मराठीच्या पेपरला 10 परीक्षार्थी बोगस

Published on

नंदेश्‍वरच्या परीक्षा केंद्रावर १० बोगस परीक्षार्थी
हॉल तिकीट तपासणीत प्रकार उघडकीस; एका मुलीसह १० विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २० ः तालुक्यातील नंदेश्‍वर येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर देताना दहा परीक्षार्थी तपासणीत बनावट आढळले. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी बनावट विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नंदेश्‍वर येथील बाळकृष्ण विद्यालयातील १४ वर्गखोल्यात आज (ता. २०, शुक्रवार)पासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाली. पहिल्या दिवशी मराठीचा पेपर असल्याने सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका दिल्यानंतर पंधरा मिनिटांनी पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट तपासणीचे काम सुरू केले. यामध्ये एका विद्यार्थ्यांकडे हॉल तिकिटाची झेरॉक्स मिळाली. ही घटना केंद्र संचालक विठ्ठल एकमले यांना समजताच त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट तपासण्यास सुरवात केली. या तपासणीमध्ये तब्बल १० विद्यार्थ्यांकडे हॉल तिकिटाचे झेरॉक्स मिळाले. त्या विद्यार्थ्यांचे बोर्डाच्या संकेतस्थळावरून दुसरे हॉल तिकीट काढण्यात आले. यामध्ये त्यावरील छायाचित्र वेगळे आणि झेरॉक्सवरील छायाचित्र वेगळे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संशय बळावत गेला. या परीक्षा केंद्रावर एकूण ३३३ विद्यार्थी परीक्षा देत होते. त्यापैकी ९ मुले व एक मुलगी, असे एकूण १० परीक्षार्थी बोगस असल्याचे पडताळणीनंतर निदर्शनास आले.
ही घटना केंद्र संचालकांनी वरिष्ठांच्या कानावर घालून तसेच पोलिस प्रशासनास संपर्क करून बंदोबस्त मागविला. त्याचबरोबर एका मुलीसह १० विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. हे विद्यार्थी लक्ष्मी दहिवडी येथील सुतार इंटरनॅशनल स्कूलचे असल्याचे केंद्र संचालकांकडून सांगण्यात आले. त्या दहा परीक्षार्थीचे पेपर जप्त करण्यात आले असून ते परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात येणार आहेत. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

चौकट...
डमी विद्यार्थ्यांचे धाडस की कोणाची मदत?
परीक्षेतील मूळ विद्यार्थी हे लक्ष्मी दहिवडी येथील सुतार इंटरनॅशनल स्कूलचे आहेत. हे मूळ विद्यार्थी कोण आहेत? हे अद्याप पुढे आले नाही. त्यांच्या जागी डमी विद्यार्थी परीक्षेला बसले, मात्र मूळ विद्यार्थी कोणीही परीक्षेला आले नाहीत, हा निव्वळ योगायोग आहे की सर्व प्रकार ठरवून घडले आहे? असा संशय बळावला आहे. परीक्षा देणाऱ्या डमी विद्यार्थ्यांनी हे धाडस कसे केले? की त्या कोणी मदत केली? असे एक ना अनेक प्रश्‍न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

कोट...
मंगळवेढा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर डमी विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये मोठे रॅकेट आहे का? याचा तपास करण्यात येणार आहे. तसेच बोर्डाचा ॲक्टनुसार या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून या प्रकरणी संस्थेचीही चौकशी केली जाणार आहे.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी

परीक्षार्थींना केंद्रात सोडण्याअगोदर त्यांच्याकडे कॉपी व इतर काही वस्तू आहेत का? हे प्रवेशद्वारावर तपासले जाते. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्यानंतर हॉल तिकीट तपासणीदरम्यान दहा विद्यार्थी बनावट दिसून आले. ते विद्यार्थी इतर जिल्ह्यातले असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात रीतसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहोत.
- विठ्ठल एकमले, केंद्र संचालक, नंदेश्वर केंद्र

नंदेश्वर केंद्रावरील परीक्षेची सर्वस्वी जबाबदारी व परीक्षा संदर्भात आवश्यक त्या सूचना शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना दिल्या आहेत. केंद्रावर गैरप्रकार आढळल्याबाबत केंद्र संचालक योग्य ती कारवाई करतील.
- दर्शन मेहता, गटशिक्षणाधिकारी, मंगळवेढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com