

नारायणगाव, ता. २० : येथील पुणे- नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्ता अपघात प्रवण आहे. अपघात झाल्यानंतर न थांबता वाहनचालक निघून जातात. नारायणगाव (ता. जुन्नर) येथील साडेतीन किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्त्यावर व्यावसायिकांनी चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे, असे मत नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण संपांगे यांनी व्यक्त केले आहे.
येथील बाह्यवळण रस्त्यावर रविवारी (ता. १६) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या प्रवासी बसची धडक बसून राकेश उर्फ अक्षय अंबेश नाईक (वय २४, रा. नारायणगाव, साकार नगरी) या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बसचालक न थांबता नाशिकच्या दिशेने निघून गेला. दुसऱ्या घटनेत सोमवारी (ता. १७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बाह्यवळण रस्त्यावर भरधाव वेगाने नाशिक बाजुकडे जाणाऱ्या ट्रेलरची धडक बसून वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील तुकाराम निंबारकर यांच्या सात मेंढ्या मृत झाल्या. अपघातानंतर चालक न थांबता ट्रेलरसह फरार झाला. या भागात नाईट व्हीजनचे चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात अद्याप यश आले नाही. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या गुन्ह्यातील वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. रात्रीची अनेक वाहने भरधाव वेगाने जातात. कॅमेरे चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे वाहनांच्या प्रतिमा स्पष्ट दिसून येत नाहीत. यामुळे तपासात अडचण येत आहे, अशी माहिती संपांगे यांनी दिली.