ध्रुवीय प्रदेशांतील बर्फाच्या विस्तारात घट

ध्रुवीय प्रदेशांतील बर्फाच्या विस्तारात घट
Published on: 

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे, ता. १३ : यंदाच्या हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात उत्तर ध्रुवीय प्रदेश (आर्क्टिक) आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशातील (अंटार्क्टिक) बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिल्याची नोंद अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेने(नासा) घेतली आहे. दरवर्षी मार्च आणि सप्टेंबरमध्ये या नोंदी घेतल्या जातात. यावर्षी आर्क्टिकच्या उन्हाळ्यात दहाव्या क्रमांकाच्या, तर अंटार्क्टिकच्या हिवाळ्यात तिसऱ्या क्रमांकाच्या नीचांकी बर्फाची नोंद झाली.
‘नासा’तर्फे १९७८ पासून उपग्रहांच्या साहाय्याने दोन्ही ध्रुवीय प्रदेशांतील बर्फाच्या कमाल आणि किमान विस्ताराच्या नोंदी घेतल्या जातात. उत्तर ध्रुवीय प्रदेशातील बर्फाचे प्रमाण उत्तर गोलार्धातील हिवाळ्याच्या अखेरीस, म्हणजे मार्चमध्ये कमाल पातळीवर, तर उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे तेथील उन्हाळ्याच्या अखेरीस, म्हणजे सप्टेंबरमध्ये किमान पातळीवर नोंदले जात असते. याविरुद्ध दक्षिण ध्रुवीय प्रदेशात मार्चमध्ये किमान आणि तेथील हिवाळ्याच्या शेवटी, म्हणजे सप्टेंबरमध्ये कमाल बर्फाची नोंद होत असते.

नीचांकी विस्तार
नासा आणि नॅशनल स्नो अँड आईस डेटा सेंटरने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबरला अंटार्क्टिकामध्ये यावर्षीच्या बर्फाचा कमाल, म्हणजे १७.५९ दशलक्ष वर्ग किलोमीटर इतका विस्तार नोंदला गेला. बर्फाचा हा कमाल विस्तार २०२३ या नीचांकी वर्षापेक्षा जास्त असला, तरी दीर्घकालीन कमाल नोंदींच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकाचा नीचांकी विस्तार ठरला.
दुसरीकडे आर्क्टिक प्रदेशात १२ सप्टेंबरला बर्फाचा ४.६ दशलक्ष वर्ग किलोमीटर इतका किमान विस्तार नोंदला गेला. हा विस्तार २००८, २०१० आणि २०२५ या वर्षांतील किमान विस्ताराइतका असून, आतापर्यंतचा हा दहाव्या क्रमांकाचा नीचांकी किमान विस्तार ठरला. यावर्षीच्या मार्चमध्ये आर्क्टिकमध्ये आतापर्यंतच्या नीचांकी कमाल बर्फाच्या विस्ताराची नोंद झाली होती.
दीर्घकालीन नोंदींनुसार, १९७९ ते २०१४ या कालावधीत अंटार्क्टिकामधील बर्फाचा विस्तार प्रत्येक दशकामध्ये एक टक्का या प्रमाणात वाढत गेला. २०१२ ते २०१४ या सलग तीन वर्षी अंटार्क्टिकामधील बर्फाच्या विस्ताराचे उच्चांक नोंदले गेले. त्याचवेळी आर्क्टिक प्रदेशातील बर्फाचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. २०१५ पासून मात्र अंटार्क्टिकामधील बर्फाचा विस्तार घटू लागला आणि २०२३ मध्ये हा विस्तार नीचांकी नोंदला गेला. ध्रुवीय प्रदेशांतील बर्फाच्या विस्तारामधील हा बदल दीर्घकालीन बदलाचा भाग आहे का, हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने बर्फाच्या नोंदी ठेवत आहेत.

मायक्रोवेव्ह संवेदकांचा वापर
ध्रुवीय प्रदेशांतील बर्फाचे प्रमाण तपासण्यासाठी शास्त्रज्ञ उपग्रहांवरील मायक्रोवेव्ह संवेदकांचा वापर करतात. हे संवेदक पृथ्वीकडून अवकाशात नैसर्गिकपणे उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेच्या नोंदी घेत असतात. समुद्रावरील बर्फ हा पाण्यापेक्षा जास्त ऊर्जा उत्सर्जित करत असल्याने बर्फाचा विस्तार मोजण्यासाठी हे तंत्र उपयुक्त ठरते. मायक्रोवेव्ह लहरी ढगांमधून विनाअडथळा प्रवास करत असल्याने बारा महिने, कोणत्याही हवामानात बर्फाच्या सातत्यपूर्ण नोंदी घेणे उपग्रहाला शक्य होते.

अंटार्क्टिकामधील किमान आणि कमाल बर्फाच्या विस्ताराचे नीचांकी वर्ष- २०२३
आर्क्टिकमधील कमाल बर्फाच्या विस्ताराचे नीचांकी वर्ष- २०२५, २०२६
आर्क्टिकमधील किमान बर्फाच्या विस्ताराचे नीचांकी वर्ष- २०१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com