नाशिकमध्ये चित्रकथी जातपंचायत बरखास्त

नाशिकमध्ये चित्रकथी जातपंचायत बरखास्त

Published on

नाशिकमध्ये चित्रकथी जातपंचायत बरखास्त
आंतरजातीय विवाहास मान्यता, बालविवाहास बंदी; बहिष्कृत कुटुंबांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)च्या जातपंचायत मुठमाती अभियानाला नाशिकमध्ये मोठे यश मिळाले. राज्यातील चित्रकथी समाजाची जातपंचायत अधिकृतपणे बरखास्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय शुक्रवारी समाजबांधवांनी एकमताने घेतला. भटका शोषित समुदाय संघर्ष संघटना आणि अंनिस यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा पुरोगामी टप्पा गाठला गेला.
नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे झालेल्या या कार्यक्रमाला राज्यभरातून आलेल्या चित्रकथी समाजबांधवांसह भटके-विमुक्त समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जातपंचायत बरखास्तीचा निर्णय घेतल्याबद्दल समाजातील प्रतिनिधींना राज्यघटनेची प्रस्ताविका देऊन सन्मानित करण्यात आले. आजच्या बैठकीत अनेक क्रांतिकारी निर्णय जाहीर करण्यात आले. यात आंतरजातीय विवाहास अधिकृत मान्यता, बालविवाहास सक्त बंदी, कोणत्याही कारणाने वाळीत टाकणे (बहिष्कार) यावर प्रतिबंध, आर्थिक दंडाची प्रथा रद्द या निर्णयांमुळे समाजातील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. जातपंचायतीच्या निर्णयामुळे वर्षानुवर्षे बहिष्कृत ठरविण्यात आलेल्या कुटुंबीयांनी कार्यक्रमात उपस्थित राहून समाधान व्यक्त केले.
एका महिलेच्या डोळ्यातील आनंदाश्रू
आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका महिलेला पाच वर्षांपासून माहेरी व समाजात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. ती या कार्यक्रमाला उपस्थित होती. आजच्या निर्णयामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या तिच्या भावाच्या विवाहाला तिला उपस्थित राहता येणार आहे. हा निर्णय जाहीर होताच तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
राज्यघटनेच्या मार्गाने न्याय
पारंपरिक जातन्याय व्यवस्थेऐवजी राज्यघटनेने दिलेल्या न्यायालयीन प्रक्रियेला स्वीकारत आहोत, असे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. समाजातील प्रश्न आता कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने सोडविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रक्रियेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात आले.

कोट
जातपंचायत ही राज्यघटनेविरोधी अन्याय व्यवस्था आहे. आणखी एक जातपंचायत बरखास्त झाल्याने लोकशाही बळकट होण्यास मदत होईल.
- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जातपंचायत मुठमाती अभियान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com