

नाशिकच्या शेतकऱ्यांना युरोप-चीन अभ्यासदौऱ्याची संधी
--
५० टक्के अनुदान; जिल्ह्यातून पाच शेतकऱ्यांची निवड होणार
--
ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना युरोप आणि चीनमधील आधुनिक शेती, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, दुग्धव्यवसाय आणि कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कृषी विभागातर्फे २०२६-२७ या वर्षासाठी ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही योजना राबविण्यात येत असून, इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी १७ ऑगस्टपर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन वाढविण्यावर भर न देता दर्जेदार उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. विकसित देशांमधील कृषी तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती, प्रक्रिया आणि व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्यांना मिळावा तसेच त्यांच्या ज्ञान व कौशल्यात वाढ व्हावी, हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत युरोपमध्ये फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धव्यवसायाचा, तर चीनमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविणाऱ्या पद्धती आणि कृषी प्रदर्शनांचा अभ्यास करता येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातून एकूण पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असून, त्यामध्ये किमान एका महिला शेतकऱ्याचा समावेश असेल. तसेच राज्य किंवा केंद्र शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त अथवा पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या अभ्यासदौऱ्यासाठी शासनाकडून एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल दोन लाख रुपये (यापैकी जी रक्कम कमी असेल) इतके अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.
फलोत्पादन, भाजीपाला आणि आधुनिक शेतीमध्ये राज्यात आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परदेशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातक्षम शेतीचा अभ्यास करून जिल्ह्याच्या कृषी विकासाला नवी दिशा द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
--
चौकट
पात्रतेचे निकष
- अर्जदार स्वतः शेतकरी असावा.
- अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे आवश्यक.
- किमान एक वर्ष वैधता असलेला पासपोर्ट असावा.
- वय २५ वर्षांपेक्षा अधिक असावे.
- एमबीबीएस डॉक्टरांचे शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आवश्यक.
- शेती हेच मुख्य उत्पन्नाचे साधन असावे.
- एका शेतकरी कुटुंबातील केवळ एका व्यक्तीला लाभ.
- यापूर्वी शासनाच्या अर्थसहाय्याने परदेश अभ्यासदौरा केलेला नसावा.
--
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे : फार्मर आयडी, पासपोर्टची प्रत, आधार कार्ड, शिधापत्रिका, वैद्यकीय प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र, हमीपत्र तसेच कृषी पुरस्कार किंवा पीक स्पर्धा विजेते असल्यास त्याची प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.