नाशिक फाटा-चांडोली रस्ता अडकला निविदा प्रक्रियेत

हरिदास कड, चाकण 
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे- नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली अशा २९ किलोमीटर सहापदरीकरणाच्या सुमारे अठराशे कोटी रुपये खर्चाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अजून झालेली नाही, त्यामुळे हे काम रेंगाळले आहे. 

या  रस्त्याच्या खर्चाच्या प्रकल्प अहवालास २०१६ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. यात काही रस्ता पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहे. तो राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी तेरा गावांतील सुमारे ६३ हेक्‍टर क्षेत्र संपादन करण्याचा आदेश २०१५ मध्ये दिला होता. यात खेड तालुक्‍यातील कुरुळी, चिंबळी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, चाकण, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, शिरोली, चांडोली आदी गावांतील ५२.१४ हेक्‍टर, तर भोसरीतील ५.५ हेक्‍टर, मोशीमधील ४.४ हेक्‍टर, बोऱ्हाडेवाडी १.२ हेक्‍टर या संपादनासाठी ९८९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या सहापदरीकरणालगत सेवा रस्ता करण्याचे नियोजित आहे.

महामार्ग दोन हद्दींत विभागल्याने विलंब
पुणे- नाशिक महामार्गाच्या सहापदरीकरण कामाची निविदा जानेवारीमध्ये निघणार होती. ती पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हस्तक्षेपामुळे रद्द झाली. या महामार्गात मोशीपर्यंत मेट्रो आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, त्यामुळे महामार्गात बदल करावा लागत आहे. हा महामार्ग पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मोशी इंद्रायणी नदीपर्यंत आहे. इंद्रायणी नदी ते चांडोली टोल नाक्‍यापर्यंत खेड तालुक्‍याच्या हद्दीत आहे. महामार्ग दोन हद्दींत विभागल्याने कामास विलंब होतो आहे. मेट्रो चाकणपर्यंत आणण्याची चर्चा होत असल्याने महामार्गाच्या डीपीआरच्या कामास विलंब लागत आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ५६ टक्के भूसंपादनाचे काम झाले आहे. काही ठिकाणी एका बाजूनेच भूसंपादन केले आहे, त्यामुळे महामार्गाची दिशा त्या ठिकाणी बदलावी लागणार आहे. अजून चाळीस टक्के भूसंपादन होणे गरजेचे आहे. महामार्ग पंचेचाळीस मीटर रुंदीचा होणार आहे. खेड तालुक्‍यात येत्या तीन- चार महिन्यांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल. संपादित होणाऱ्या जमिनींची मोजणीही करण्यात आली असून, काहींना मोबदलाही देण्यात आला आहे. महामार्गाच्या कामाचा डीपीआर पूर्ण झाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, असे नॅशनल हायवे ॲथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Nashik Phata-Chandoli road tender issue