

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध दर्शविणाऱ्या कन्या नताशा आव्हाड यांच्या भूमिकेचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी समर्थन केले आहे. ‘मुलीच्या मतस्वातंत्र्यावर बंधने घालण्याचे काम आमच्या कुटुंबात कोणीही केलेले नाही. तिला तिचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाची संभाव्य भूमिका आणि नताशा यांचे स्वतंत्र मत यामुळे राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
नताशा आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर भूमिका मांडताना मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे राज्यघटनेशी प्रतारणा करण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘नताशा माझी एकुलती एक कन्या आहे. तिच्या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचे काम आमच्या कुटुंबात कोणीही केलेले नाही. तिला तिचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. शरद पवार हे लोकशाहीवादी नेते आहेत. तेही तिला गप्प बसविण्यास सांगणार नाहीत.’’ नताशा सध्या एका परिषदेसाठी लंडनला गेल्याचेही त्यांनी सांगितले.
...