आयुष - राष्ट्रीय आरोग्य मेळावा

आयुष - राष्ट्रीय आरोग्य मेळावा

Published on

देशाच्या बळकटीसाठी
निरोगी नागरिक महत्त्वाचा

राष्ट्रपती मुर्मू : राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याला शेगावात प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शेगाव, ता. २५ : ‘‘आपल्या जीवनात निरामय आरोग्य महत्त्वाचे मानले आहे कारण सशक्त व निरोगी नागरिक हा देशाच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. आयुष मंत्रालयाच्या प्रणालीने यासाठी अमूल्य योगदान दिलेले आहे. त्यामुळेच हा राष्ट्रीय मेळावा देशी उपचार पद्धतीला जगभरात स्वतंत्र ओळख निर्माण करून देईल,’’ असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी (ता. २५) येथे व्यक्त केला.

केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे शेगावात आयोजित ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६’च्या उद्‍घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कामगार मंत्री आकाश फुंडकर, पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, पद्मश्री वैद्य देवेंद्र त्रिगुणा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

राष्ट्रपती म्हणाल्या, की देशातील बहुगुणी औषधी वनस्पतींचे संरक्षण, संवर्धन आणि संगोपनाच्या क्षेत्रामध्ये आयुष मंत्रालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ‘आयुष’च्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण देखील होते. मन आणि शरीर दोन्हीही स्वस्थ ठेवण्यासाठी आयुष मंत्रालय करीत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगून आपण स्वतः आयुर्वेद जीवन पद्धती अंगीकारली असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. आयुष मंत्रालयाकडून आयुर्वेदाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे आगामी काळात औषधीसाठी आपले परावलंबित्व कमी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकार अर्थसंकल्पातही आयुष मंत्रालयाला प्राधान्य देऊन देशी उपचारांना बळकटीकरणास महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते दूरनियंत्रकाद्वारे मेळाव्याचे उद्‍घाटन केले. आशुतोष गुप्तांनी केलेल्या आरोग्य तपासणीने मेळाव्यास प्रारंभ झाला. यावेळी बोलताना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ऋषिमुनींनी हजारो वर्षांपासून केलेले संशोधन उच्च दर्जाचे व गुणवत्तापूर्ण होते हे आता दिसून येत असल्याचे सांगितले. पालकमंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले, की या चार दिवसांच्या राष्ट्रीय शिबिराच्या माध्यमातून प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धतीला जगभरात ओळख मिळून त्याचा प्रचार-प्रसार होईल. केंद्रीय आयुष राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा सत्कार केला. राष्ट्रपतींनी वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांना जीवनगौरव, आशुतोष गुप्ता यांचा आयुर्वेद गौरव, डॉ. मनीषा कोठेकर यांचा संशोधनासाठी, तर रामदास आव्हाड यांना धन्वंतरी पुरस्कार प्रदान केले.


बॉक्स

‘तीन संशोधन संस्था उभारणार’
भारतीय पारंपरिक उपचार पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी देशात तीन अखिल भारतीय संशोधन संस्था उभारण्यात येणार आहेत. आयुर्वेद व आयुष मंत्रालयांतर्गत असलेले होमिओपॅथी, युनानी ही उपचार पद्धती ग्रामीण भागातील लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com