Pune News : पुणे जिल्हा सलग नवव्यांदा दावे निकाली काढण्यात राज्यात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Lok Adalat Pune ranked first in state settling claims ninth time in row

Pune News : पुणे जिल्हा सलग नवव्यांदा दावे निकाली काढण्यात राज्यात प्रथम

पुणे : राष्ट्रीय लोक अदालतमध्ये राज्यात सर्वाधिक प्रकरणे निकाली काढण्यात पुण्याने आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. शनिवारी झालेल्या लोकअदालतीत ७८ हजार २०६ प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले आहे. सतत नवव्यांदा पुणे जिल्ह्याने दावे निकाली काढण्यातील प्रथम क्रमांक मिळवला आहे.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली येथील लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालतीच्या माध्यमातून विभक्त झालेले संसारही जोडले गेले आहेत. घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या सहा जोडप्यांनी समुपदेशनानंतर परत एकदा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

सह दिवाणी न्यायाधीश जागृती भाटिया यांनी दोन प्रकरणात वयोवृद्ध व्यक्ती असल्याने व्हिडिओ कॉन्फरसद्वारे सुनावणी घेतली. जिल्हा न्यायाधीश भूषण क्षीरसागर यांच्या पॅनेलवर ११३ मोटार अपघात प्रकरणात विविध विमा कंपन्यांकडून गरजूंना नुकसान भरपाई मिळाली.

दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर राजेंद्र तांबे यांच्या पॅनेलवर घेण्यात आलेल्या १८२५ प्रकरणांपैकी ११८ जमीन अधिग्रहण प्रकरणे निकाली काढण्यात येऊन ११ कोटी ९५ लाख ३९ हजार रुपये एवढी रक्कम वसूल करण्यात आली.

११७ कोटी ५६ लाख तडजोड शुल्क वसूल

तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या दोन लाख २४ हजार ५१६ दाव्यांपैकी १३ हजार ७९५ दावे निकाली काढण्यात आले. त्यात ७० कोटी ७२ लक्ष ४४ हजार ४२६ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

वादपूर्व एक लाख ९६ हजार ८ प्रलंबित प्रकरणांमधून ६४ हजार ४११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात ४६ कोटी ८३ लाख ७८ हजार ३८४ तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण ७८ हजार २०६ प्रलंबित दावे निकाली काढण्यात येऊन ११७ कोटी ५६ लाख २२ हजार ८१० रुपये लक्ष रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.

दाव्याचा प्रकार - निकाली दाव्यांची संख्या

- बँकेची कर्जवसुली - १२७७

- तडजोड पात्र फौजदारी गुन्हे - ७८१९

- वीज देयक - २४७

- कामगार विवाद खटले - ७

- भूसंपादन - ११८

- मोटार अपघात दावे न्यायाधिकरण - १२५

- वैवाहिक विवाद - २१७

- निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट - १५२५

- इतर दिवाणी - ६७४

- महसूल - २०३

- पाणी कर - ६१९९०

- ग्राहक विवाद - ६

- इतर - ३९९८

एकूण - ७८,२०६

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेल्या आठ राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नऊ लाखापेक्षा जास्त दाखल असलेली व दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशा प्रकारे पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे. तर प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

- मंगल कश्यप, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण