निसर्ग संवर्धक अनिल खैरे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्ग संवर्धक अनिल खैरे यांचे निधन

निसर्ग संवर्धक अनिल खैरे यांचे निधन

पुणे: भारतीय सर्प विज्ञान संस्थेचे अध्यक्ष अनिल खैरे (वय ६५) यांचे अल्प आजारामुळे रविवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजता निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. खैरे यांनी आपल्या बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयटीआयचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी टेल्को कंपनीत काही वर्षे नोकरी केली.

अनिल यांचे ज्येष्ठ बंधू नीलिमकुमार खैरे हे विख्यात सर्प तज्ज्ञ असल्याने त्यांच्या प्रमाणे अनिल यांना ही निसर्ग संवर्धनाची आवड निर्माण झाली. पुढे त्यांनी इंग्लंड मधील जर्सी वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे (सध्याची ड्यूरेल वाईल्डलाईफ ट्रस्ट) प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी कात्रज सर्पोद्यान आणि अनाथ प्राणी पक्षी अनाथालय व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. याच संस्थेच्या तर्फे पिंपरी महापालिकेच्या बहिणाबाई उद्यानाचे संचालक म्हणून ही त्यांनी काम पाहिले होते.

वन्य जीव वाचविण्यासाठी त्यांचा सक्रिय पुढाकार असायचा. कोंढवा भागात आलेला बिबट्या सुरक्षितरीत्या पकडून निसर्गात सोडण्याची मोहीम त्यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. अशा प्रकारे अनेक मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. हार्पिटन या नावाचे शास्त्रीय संशोधन निबंध असलेले नियतकालिक प्रसिद्ध करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यांच्या निधनानंतर अनेक निसर्ग प्रेमींमध्ये शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :katraj