

गेल्या काही दिवसांपासून नवले पूल हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. नवले पुलाजवळ झालेल्या एका अपघातात आईचा मृत्यू झाला आहे तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सकाळी हा अपघात झाला होता. कुटुंबासोबत पर्यटनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. गाडी मध्ये बसत असताना दुसऱ्या एका गाडीने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. योजना शिवशंकर महंत (वय ३२, रा. मोशी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मुलगा शिवांश महंत हा गंभीर जखमी झाला आहे. सिंहगड रस्त्या जवळील नवले पुलाजवळ हा दुर्दैवी अपघात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल सुरवसे आणि शिवशंकर महंत हे दोघे कुटुंबासह रत्नागिरी येथे चालले होते. रविवारी पहाटे त्यांची कार नवले ब्रिजच्या पुढे एका हॉटेलसमोर उभी होती. गाडीत बसण्यासाठी ते पायी चालत जात होते. त्याचवेळी पाठिमागून आलेल्या भरधाव गाडीने अमोल, शिवशंकर व त्यांची पत्नी योजना आणि मुलगा शिवांश यांना धडक दिली. या अपघातानंतर चालक तेथून पळून गेला. पसार झालेल्या कार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान रविवारी साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना अक्षरशः उडविले. या भीषण अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेमुळे महामार्गावर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सततचे अपघात रोखण्यासाठी नवले पुल हा वडगाव पुलाला जोडण्यासंदर्भातील प्रस्ताव काही दिवसांपूर्वी मांडण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा प्रस्ताव पुणे महापालिकेला देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर प्रस्ताव पुढे सरकले नाही. अशातच आता हा भीषण अपघात झाल्याने नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आगामी काळात तरी प्रशासन काही निर्णायक पावले उचलणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.