

PNE26W55612
सोलापूर : नवरात्रोत्सव व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातील कमिटी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलिस आयुक्त एम. राज कुमार.
गुलाल उधळण्याचे फटाके उडवू नका!
पोलिस आयुक्तांचे आवाहन; नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बैठक
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : मिरवणुकांमध्ये आम्ही इतर धर्मीयांच्या धार्मिकस्थळांच्या समोरील बाजूस हिरवे कापड लावतो. तेथून मिरवणूक जाताना अनुचित प्रकार होऊ नये, हा त्यामागील हेतू असतो. पण, आता गुलाल उधळण्याचे फटाके आले असून त्यातून ३० फूट उंच गुलाल उडतो. त्यामुळे धार्मिक स्थळांना कापड लावूनही त्याचा फायदा होत नाही. दुसरीकडे महापालिकेचे सफाई कर्मचारी वर्षभर जेवढी स्वच्छता करत नसतील, तेवढी स्वच्छता त्यांना मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी करावी लागते. या पार्श्वभूमीवर सर्वांनीच ते फटाके वापरू नयेत, त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी केले.
मंगळवारी (ता. ६) पोलिस आयुक्तालयात नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी पोलिस आयुक्तांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, वृष्टी जैन, सहायक आयुक्त अरुण देवकर, सुधीर खिरडकर, दिलीप पवार, विजयालक्ष्मी कुर्री, महापालिकेच्या उपायुक्त वीणा पवार यांच्यासह आरटीओ, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. ११ ते २५ या नवरात्रोत्सवात डिपॉझिट भरून वीज कनेक्शन घ्यावे. उत्सवानंतर लगेचच डिपॉझिट परत केले जाईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे महापालिकेच्या उपायुक्त पवार यांनी सर्वच विभागांचे विभागप्रमुख तेथे आणले होते. सर्वांनी पदाधिकाऱ्यांच्या सूचना ऐकल्या आहेत, ते त्यासंदर्भात वेळेत कार्यवाही करतील, असे सांगितले.
---
चौकट
शेतकऱ्यांसाठी मदतीचे आवाहन
या बैठकीत गणेश चिंचोळी व विजय पुकाळे यांनी सर्व नवरात्रोत्सव मंडळांना दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. उत्सवातील अनावश्यक खर्च टाळून शेतकऱ्यांना अन्नधान्य, जनावरांसाठी चारा देण्यासाठी मदत करावी, असेही ते म्हणाले. यावेळी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी साद घातली.
चौकट...
मुस्लिम बांधवांनी राखला जातीय सलोखा
गणेशोत्सवात अनेकजण म्हणायचे, या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावा, दंगलीची शक्यता आहे, तेथे शांतता बिघडू शकते. पण, उत्सवात मुस्लिम बांधव सक्रिय सहभागी झाले होते. त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. हाच जातीय सलोखा कायमस्वरूपी राहावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले. यावेळी त्यांनी नवरात्रोत्सवात मंडळांनी स्वतःचे सीसीटीव्ही लावावेत, असेही आवाहन केले.
चौकट...
कोण काय म्हणाले...
* ‘डीसीपी’ डॉ. पाटील : सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, डिजिटल बॅनरवरील मजकूर आक्षेपार्ह नसावा, तो तपासून घ्यावा, इतर धार्मिकस्थळाजवळ मिरवणूक रेंगाळू देऊ नये, घोषणाबाजी करू नये. मिरवणूक मार्ग अचानक परवानगीशिवाय बदलू नये.
* शुभम कांबळे : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मोठी मिरवणूक निघते. यावेळी लेझीम पाहायला अनेकजण येतात. त्यांच्यासाठी मिरवणूक मार्गावर फिरती शौचालये व पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
* ब्रह्मदेव गायकवाड : मंगळवार पेठ पोलिस चौकीजवळून काठी पालखी मिरवणूक जाते. यावेळी तेथे काही मंडळांच्या मिरवणुकाही असतात. त्याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असावा, जेणेकरून काठी पालखी मिरवणुकीस अडथळा येणार नाही.
* विजय पुकाळे : महापालिकेकडून पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सूचनांवर कार्यवाही होत नाही. उत्सवात महापालिकेने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे चालू मोबाईल क्रमांक द्यावेत. शमी वृक्षाजवळ अतिक्रमण झाले असून त्याठिकाणी स्वच्छता करावी.
* सुशील सरवदे : बॅनरवरील मजकूर तपासावा, दुसरीकडे काहीजण त्यासाठी महापालिकेला शुल्क भरतात. पण, अनेकजण विनापरवाना डिजिटल लावतात. या पार्श्वभूमीवर डिजिटलला बंदीच घातली तर बरे होईल.
* लखन गायकवाड : नळबझार चौकात मिरवणुकीवेळी मोठी गर्दी होते. होटगी नाका येथे कचरा डबा आहे, तो उत्सवकाळात बाजूला करावा. मुर्गी नाला भाजी मंडईजवळील महावितरणचा ‘डीपी’ दुरुस्त व्हावा.
* दिलीप कोल्हे : श्री रूपाभवानी मंदिराजवळ कचऱ्याचा मोठा खड्डा आहे. उत्सवकाळात त्याठिकाणी अस्वच्छता होऊ नये. दर्शनासाठी हजारो महिला, भाविक तेथे येतात. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर लाईटची सोय करावी.
* विनोद इंगळे : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ही बैठक असल्याची माहिती अनेकांना नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घ्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
* शोभना सागर : नवरात्रोत्सवात अश्लील गाणी लावू नयेत, भक्तिगीते लावावीत. स्वच्छता देवीला प्रिय असून सर्वांनी स्वच्छता राखावी.
* ॲड. प्रशांत कांबळे : नवरात्रोत्सवात ज्योत आणायला जाताना दुचाकीचे सायलेन्सर काढले जातात. मोठमोठे स्पीकर लावलेली वाहने शहरातून जातात. पुंग्या विक्रेत्यांवर कारवाई करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.