एकजूट आणि कष्ट हाच संकटांवर मात करण्याचा मार्ग मनोज जरांगे पाटील
PDE26B04982
वरकुटे (ता. करमाळा) ः नवनाथ गात स्मृतीदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देताना मनोज जरांगे-पाटील, आमदार नारायण पाटील, बाबूराव हिरडे व अन्य.
एकजूट अन् कष्ट हाच संकटांवर मात करण्याचा मार्ग ः मनोज जरांगे-पाटील
वरकुटे शहीद जवान गात यांच्य स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम; विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
पांडे, ता. ३ : सामाजिक जीवनात प्रत्येक स्तरावर अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. आर्थिक अडचणी, सामाजिक विसंवाद, बेरोजगारी आणि व्यसनाधीनता यासारख्या समस्यांनी समाजासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी एकजुटीने आणि परस्पर सहकार्याच्या भावनेने वाटचाल करणे काळाची गरज आहे. शहिदाच्या स्मृती जपणे म्हणजे केवळ कार्यक्रम करणे नव्हे, तर त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाजहिताचे कार्य करणे होय, असे प्रतिपादन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.
शहीद जवान नवनाथ गात यांच्या २३ व्या स्मृतीदिनानिमित्त वरकुटे (ता. करमाळा) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डाॅ. बाबूराव हिरडे हे होते. यावेळी आमदार नारायण पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गणेश करे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या रश्मी बागल, देविदास ताकमोगे, योगेश दळवी, आक्रूर शिंदे, अण्णासाहेब ढाणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जरांगे-पाटील म्हणाले, गेल्या २३ वर्षांपासून शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याबद्दल त्यांनी स्मारक समिती व ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे, शौर्य पुरस्कार सांगोला येथील रावसाहेब साळुंके, आदर्श शाळेचा पुरस्कार आदलिंग वस्ती शाळा कोंढेज, क्रीडा पुरस्कार शिवम अण्णासाहेब ढाणे, प्रा.डॉ. संदीप ओहोळ यांचा समावेश आहे.
यावेळी रक्तदान शिबिरात ८५ जणांनी रक्तदान केले आहे. रक्तसंकलनाचे कार्य रामभाई शहा रक्तपेढी (बार्शी) व श्री कमला भावनी रक्तपेढी (करमाळा) यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीतांनी देशभक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आली. स्मारकाचे पूजन ॲड. हिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल व भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते झाले.
सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले. प्रस्ताविक नीलकंठ ताकमोगे यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला, तर उपस्थितांचे आभार सचिन गात, नागनाथ गात यांनी मानले.
चौकट
सातारा गॅझेट लागू न झाल्यास पुन्हा आंदोलन
मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे याचा फायदा गरजूंना होत असून, ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. यानंतर सातारा संस्थान गॅझेट व कोल्हापूर संस्थांच्या गॅजेटचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर याचा फायदा राज्यातील वंचित समाज बांधवांना होणार आहे. सात तारखेपर्यंत या संदर्भात सकारात्मक निर्णय अपेक्षित असून तो न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

