माओवाद्यांचा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजीसह तेलंगणात शरण
नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता शरण
थिप्परी तिरुपतीची पोलिसांसमोर शस्त्रे टाकली; मल्लाराजी रेड्डीचीही शरणागती
सकाळ वृत्तसेवा
गडचिरोली, ता. २२ : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती ऊर्फ देवजी आणि केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी ऊर्फ संग्राम या दोघांसह १५ पेक्षा अधिक सशस्त्र नक्षलवाद्यांनी रविवारी (ता. २२) तेलंगण राज्यातील आसिफाबाद पोलिसांपुढे शरणागती पत्करल्याची माहिती आहे.
एप्रिल-मे २०२५ मध्ये छत्तीसगडच्या दहा हजारांहून अधिक पोलिसांनी करेगुट्टा डोंगरावर या नक्षलवाद्यांना घेरले होते. या अभियानादरम्यान २१ मे रोजी नक्षलवाद्यांचा देशातील सर्वोच्च नेता नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू ठार झाला होता. त्यानंतर तिरुपती थिप्परी ऊर्फ देवजी यास राष्ट्रीय सरचिटणीस बनविण्यात आले होते. १८ नोव्हेंबर २०२५ ला माओवाद्यांचा मिलिटरी कमांडचा प्रमुख माडवी हिडमा आणि त्याच्या पत्नीला छत्तीसगड पोलिसांनी ठार केले. त्यानंतर देवजी हाही शरण येणार अशी चर्चा होती. अखेर रविवारी त्याने मुलूगू जिल्ह्यात शस्त्रांसह शरणागती पत्करली. तेलंगण पोलिसांनी अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक ते दोन दिवसात ही घोषणा होऊ शकते.
मूळचा तेलंगणातील करीमनगर (जगतीयाल जिल्हा) येथील रहिवासी असलेल्या देवजीवर महाराष्ट्र, तेलंगणासह विविध राज्यांत एकूण दहा कोटींचे बक्षीस होते.
देवजी (थिप्परी तिरुपती) हा १९९१ मध्ये झालेल्या माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अपहरणाच्या कटातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असल्याचे मानले जाते.
आता उरले मोजकेच
देवजीनंतर आता या चळवळीत मोजकेच नेते शिल्लक आहेत. त्यात मुप्पाला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती (वय ७५), मिशीर बेसरा (वय ६३), मल्ला राजी रेड्डी ऊर्फ संग्राम (वय ७३)यांचा समावेश आहे. त्यातील गणपती प्रकृती ठीक नसल्यामुळे अनेक दिवसांपासून भूमिगत असल्याचे कळते. देवजीच्या शरणागतीनंतर चळवळीची जबाबदारी मिशीर बेसराकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

