राष्ट्रवादी काँग्रेस ‘इव्हेंट’ करत आहे - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला म्हणून आता निदर्शने करता. छगन भुजबळांना अटक झाली, त्या वेळी का केली नाहीत, याचे उत्तर द्या. आताही ते इव्हेंट करीत असून, त्यांना केवळ प्रसिद्धी मिळवायची आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली.

पुणे - माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला म्हणून आता निदर्शने करता. छगन भुजबळांना अटक झाली, त्या वेळी का केली नाहीत, याचे उत्तर द्या. आताही ते इव्हेंट करीत असून, त्यांना केवळ प्रसिद्धी मिळवायची आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली.

राज्य सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी पवार यांच्यावर ‘ईडी’ने गुन्हा दाखल केल्याचा वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्य सरकार आकसाने वागत असल्याचा आरोपही केला जात आहे. याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करताना पाटील म्हणाले, ‘‘हा गैरव्यवहार २५ हजार कोटी रुपयांचा असल्याने ‘ईडी’ने नियमानुसार स्वत:च कारवाई केली आहे. राज्य सरकारचा त्यात कोणताही हस्तक्षेप नाही.’’

शरद पवार यांचा सल्ला मानणारे सरकार सत्तेवर असताना, त्या वेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या गैरव्यवहारच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे. कदाचित त्या वेळी चव्हाण यांनी हे आकसाने केले असावे. हे प्रकरण त्यांच्याच सरकारच्या काळातील असल्याने यात आमच्या सरकारला आकस असण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. भाजप-शिवसेना युतीबाबत बोलताना, ‘‘चर्चा अंतिम टप्प्यात आहे. युती होणारच आहे,’’ असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP is doing event Says Chandrakant Patil