राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम

ज्ञानेश सावंत - @SSDnyaneshSakal
रविवार, 5 मार्च 2017

शहरापाठोपाठ उपनगरांमधील विशेषत: हडपसर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लगाम घालण्याच्या इराद्याने भारतीय जनता पक्षाने व्यूहरचना आखली खरी; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला धोका नव्हे, तर धक्काही बसू शकलेला नाही. महापालिकेच्या मुंढवा-मगरपट्टा सिटीमधील (प्रभाग क्र.२२) चार जागांवर दणदणीत विजयी मिळवत राष्ट्रवादीने आपला वरचष्मा कायम राखला. पराभव पत्करावा लागला, तरी या भागात पहिल्यांदाच भाजपने दिलेल्या चारही उमेदवारांना मतदारांची चांगली साथ मिळाल्याचे निकालावरून आढळून आले आहे. 

या प्रभागातील ‘अ’ गटातून चेतन तुपे, ‘ब’ मधून हेमलता मगर, ‘क’ गटातील चंचला कोद्रे आणि ‘ड’ गटातून सुनील ऊर्फ बंडू गायकवाड  विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात बहुसदस्यीय प्रभागरचनेमुळे भाजपचे आव्हान होते. मात्र, काँग्रेसबरोबर आघाडी करीत राष्ट्रवादीने चारही जागा आपल्याकडेच ठेवल्या. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दोन्ही काँग्रेसमधील तुल्यबळ कार्यकर्त्यांना पक्षात घेत भाजपने त्यांनाच राष्ट्रवादीच्या विरोधात उतरविले होते; परंतु त्याचा परिणाम झाला नसल्याचे निकालावरून दिसून आले. 

भाजपकडून दिलीप (आबा) तुपे, संदीप दळवी, सुजाता जमदाडे आणि सुकन्या गायकवाड, तर शिवसेनेकडून सुनील गायकवाड, गीतांजली आरू, सुवर्णा जगताप आणि समीर तुपे निवडणूक रिंगणात होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोमल गायकवाड, प्रकाश बोलभट, विशाल बोरावके उमेदवार होते. 

मुंढव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची, तर माळवाडी आणि आकाशवाणी परिसरात राष्ट्रवादीची ताकद आहे. मात्र, गेल्या दोन-अडीच वर्षांत भाजपने मगरपट्टा सिटीत आपला मतदार वाढविल्याचे दिसून आले. परिणामी, येथील लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले. माळवाडीतील मतांची विभागणी करून  चेतन तुपे यांना रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, ते फारसे यशस्वी झाले नाहीत. त्यातच बंडू गायकवाड आणि दिलीप तुपे यांच्यासह चंचला कोद्रे आणि सुकन्या गायकवाड यांच्यातील चुरस हे निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे पारडे जड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP dominance