Video : कोरोनाचा कहर तरी, शरद पवारांनी तरुण कार्यकर्त्याला श्रद्धांजली द्यायला गाठलं त्याचं गाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

दिवंगत अजिंक्य घुले यांच्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी कोरोनाच्या या संकटातही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्याजवळील मांजरी येथील घुले कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

मांजरी : निवडणुकांपुरते राजकारण आणि नंतर उर्वरित काळ समाजकारण या न्यायाने गेली पन्नासहून अधिक वर्षे राजकारणात केंद्रबिंदू राहिलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा पैलूही वेगळा आहे. अकाली वयात हृदयविकाराच्या झटक्याने जग सोडून गेलेल्या अजिंक्य घुले यांच्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी कोरोनाच्या या संकटातही पवार यांनी पुण्याजवळील मांजरी येथील घुले कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या कठिणसमयी आपला नेता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे पाहिल्यानंतर घुले कुटुंबियांना अश्रू अनावर झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती अजिंक्य सुरेश घुले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुंबईवरून येत हडपसर येथे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन संवेदना व्यक्त केली. पक्षाच्या एका छोट्या कार्यकर्त्याचीही अस्थेवाईकपणे दखल घेण्याची नागरिकांमध्ये चर्चा होती. 

दरम्यान, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले यांचे पुत्र अजिंक्य घुले यांचे गुरूवारी ह्रदयविकाराने निधन झाले. अजिंक्य घुले या पक्षाच्या तरूण कार्यकर्त्याने फेब्रुवारी २०१७ मध्ये मांजरी बुद्रुक गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर पंचायत समितीची निवडणुक जिंकली होती. लगेचच पुढील सव्वा वर्षे त्यांना उपसभापतीपदी काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत होते. 

हेही वाचा- कामगारांसाठी ब्युरो स्थापन करणार, तर धमकविणाऱ्यांविषयी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले...

आण्णासाहेब मगर कला व क्रिडा मंडळ आणि सुरेश अण्णा घुले मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी तरूणांचे मोठे संघटन केले होते. त्यांच्या सहकार्यातून घुले यांनी परिसरात सामाजिक काम सुरू ठेवले होते. दरवर्षी ते सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या येथील अनाथाश्रमातील मुलांसाठी त्यांनी वर्षभरापासून मोफत धान्य व भाजीपाला पुरवठा सुरू केला होता. 

त्यांचे वडील सुरेश घुले हे पक्षाच्या स्थापनेपासून पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. पक्षाच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. एकुलत्या एक पुत्राच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. खासदार पवार यांना ही बातमी समजल्यानंतर आज तिसऱ्याच दिवशी ते थेट मुंबईवरून त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी आले होते. कुटुंबातील सदस्यांना आपण व पक्ष आपल्या दु:खात सहभागी असल्याचे सांगून दु:ख सावरण्यासाठी धीर दिला. पक्षाचा एक तरूण व संघटन कौशल्य असलेला कार्यकर्ता गमवल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील व राज्यातील विविध पक्षांचे आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांनीही घुले यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. आमच्यासारख्या पक्षाशी एकनिष्ठ व पवार कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या दु:खात सहभागी होऊन पवार साहेबांनी आपले मोठेपण पुन्हा एकदा सिध्द केल्याची भावना घुले यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. त्याचबरोबर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रीया व्यक्त केल्या. दरम्यान नागरिक म्हणत आहेत, ''स्वतःच वय, व्याधीची देखील पर्वा न करता पवार हे एका कार्यकर्त्यांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाला आधार देण्यासाठी कसलीही तमा न करता थेट मुंबईवरून आले नेता असवा तर असा''. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajinkya Ghule passes away