Vidhan Sabha 2019 : मनसेला कुठे साथ द्यायची हे आम्ही ठरवू : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 October 2019

नेत्यांनी कोणत्या पक्षात जायचे हा त्यांची प्रश्न आहे. उमेदवारांचा प्रचार करताना स्थानिक बाहेरचा असा भेदभाव मी करत नाही. शिवसेनेने पाच वर्षे झोपा काढल्या का? आता कर्जमाफी करू असे शिवसेना म्हणत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आता ते पोकळ आश्वासने देत आहेत.

पुणे : मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष पातळीवर ठरविले आहे, की कोठे उमेदवार उभे करायचे आणि कुठे साथ द्यायची, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी आज (बुधवार) पुण्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. तसेच करमाळ्यातील जागेबाबतही स्पष्टीकरण दिले. भोसरीत विलास लांडे हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, की नेत्यांनी कोणत्या पक्षात जायचे हा त्यांची प्रश्न आहे. उमेदवारांचा प्रचार करताना स्थानिक बाहेरचा असा भेदभाव मी करत नाही. शिवसेनेने पाच वर्षे झोपा काढल्या का? आता कर्जमाफी करू असे शिवसेना म्हणत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आता ते पोकळ आश्वासने देत आहेत. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. माझे अश्रु सांगण्यापेक्षा युती कशी टिकेल हे उद्धव ठाकरे यांनी पहावे. पवारसाहेबांचे ईडीने नाव घेतले, पण पवारसाहेब कोणाबरोबर सुडाने वागले नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलेले मत वैयक्तिक आहे. त्याबद्दल मी काही बोलून संभ्रम निर्माण करणार नाही. आमचे प्रांत अध्यक्ष व काँग्रेस प्रांत अध्यक्ष याविषयी बोलतील. देशाची निवडणूक नाही राज्याची निवडणूक आहे, त्यामुळे कलम 370 चा मुद्दा आता राज्यात नाही. आघाडीचे 175 उमेदवार निवडून येतील असा विश्वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar talked about help to MNS