राष्ट्रवादीला पंक्चर चाक म्हणणाऱ्यांना खासदार अमोल कोल्हेंचे सडेतोड उत्तर

टीम ई-सकाळ
Tuesday, 29 October 2019

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही मॅरेथॉन सभा घेऊन राष्ट्रवादीला बळ दिलं होतं. निवडणुकीच्या आधी खासदार कोल्हे यांची सोशल मीडियावर चेष्टा करण्यात आली होती. त्याला आता खासदार कोल्हे यांनी सोशल मीडियावरूनच उत्तर दिलंय. 

पुणे : विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झालं नाही. पण, शिवसेना आणि भाजपला अपेक्षित यशही मिळालं नाही. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं अनपेक्षित यश मिळवलंय. या यशात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचवेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही मॅरेथॉन सभा घेऊन राष्ट्रवादीला बळ दिलं होतं. निवडणुकीच्या आधी खासदार कोल्हे यांची सोशल मीडियावर चेष्टा करण्यात आली होती. त्याला आता खासदार कोल्हे यांनी सोशल मीडियावरूनच उत्तर दिलंय. 

अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, 
सहज फोन चाळताना ऑगस्ट महिन्यातली एक पोस्ट समोर आली आणि सहज सुचलं. 
फुंकर तीच असते
जी मेणबत्ती विझवू शकते अन
निखारा चेतवू शकते
टीकेच्या वाऱ्याने भेलकांडायचं की
तेच वारं शिडात भरून घ्यायचं
आपलं आपण ठरवायचं!
कदाचित त्या वेळी पोस्ट तयार करणारा "गोवर्धन" उचलण्याची गोष्ट विसरला असावा. महाराष्ट्रात "शरदचंद्रजी पवार" नावाचा झंझावात आला अन (पोस्ट टाकणाऱ्या व त्यावर हसणाऱ्यांना) पंक्चर वाटणारी गाडी 105च्या स्पीडने सुसाट निघाली.

अमोल कोल्हेंचाही झंझावती प्रचार
खासदार अमोल कोल्हे यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवारांचा प्रचार केला होता. संपूर्ण राज्यातून खासदार कोल्हे यांच्या सभांना जोरदार मागणी होती. शरद पवार यांनी जुन्नरच्या एका सभेतही त्यांना असलेल्या मागणीचा उल्लेख केला होता. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर, अनेक ठिकाणी काँग्रेसच्या प्रचारालाही खासदार कोल्हे यांनी हजेरी लावली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader mp dr amol kolhe facebook reaction to trollers over election