माळेगावची सत्ता खेचून आणल्यानंतर एकच वादा अजितदादा...

मिलिंद संगई
Tuesday, 25 February 2020

निकाल हाती येत होते तसतसा कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होत होता. एकच वादा अजितदादा....या घोषणांनी आज आसमंत दुमदुमून गेला. राष्ट्रवादी पुन्हाच्या गीतावर कार्यकर्त्यांनी ठेका धरत नाचही केला तर अनेकांनी परस्परांवर गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. 

बारामती/ माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणल्यानंतर आज बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली. गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. एकच वादा अजितदादा....या घोषणेने मतमोजणी केंद्राचा परिसर दुमदूमून गेला होता. 

काल मतमोजणीस साडेतीन तासांहून अधिकचा विलंब झाल्यानंतर जसजसा मतमोजणीचा कल राष्ट्रवादीच्या दिशेने झुकू लागला, तसा राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह  संचारला. 24 तासांहून अधिक काळ मतमोजणी सुरु असूनही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. अनेकांनी रात्र मतमोजणी केंद्राबाहेर रस्त्यावर जागून काढली.

निकाल हाती येत होते तसतसा कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होत होता. एकच वादा अजितदादा....या घोषणांनी आज आसमंत दुमदुमून गेला. राष्ट्रवादी पुन्हाच्या गीतावर कार्यकर्त्यांनी ठेका धरत नाचही केला तर अनेकांनी परस्परांवर गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. काही उत्साही कार्यकर्ते व उमेदवारही निकालानंतर थेट अजित पवार यांचे आशिर्वाद घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP party Workers celebrate the win of Ajit Pawar in Malegaon Sugar factory