Vidhan Sabha 2019 : पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या 3 वरून होणार 8?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 October 2019

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीकडे सध्या एकही आमदार नाही. जिल्ह्यात सध्या बारामतीमध्ये अजित पवार आणि आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे-पाटील आमदार आहेत. मावळमध्ये पक्षाचे सुनील शेळके यांनी भाजपचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे.

पुणे : पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वातावरण पुन्हा एकदा निर्माण झाले आहे, असे वाटत आहे. वातावरणाचा रूपांतर मतांमध्ये झाले तर पक्षाच्या जागांची संख्या 3 वरून तब्बल 5 ने वाढून 8 पर्यंत होऊ शकते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीकडे सध्या एकही आमदार नाही. जिल्ह्यात सध्या बारामतीमध्ये अजित पवार, इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आणि आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे-पाटील आमदार आहेत. मावळमध्ये पक्षाचे सुनील शेळके यांनी भाजपचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यात शेळके यांचा जनसंपर्क पाहता ते विजयी होऊ शकतात. मात्र, या मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आहे.

जुन्नरमध्ये मनसेतून शिवसेनेत गेलेले शरद सोनवणे यांना शिवसेनेच्या पूर्वाश्रमीच्या कार्यकर्त्यां आणि सध्या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या आशा बुचके यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. या मतविभागणित राष्ट्रवादीचे अतुल बेनके सहज निवडून येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

खेडमध्ये सध्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरे यांच्यासमोर भाजपचे बंडखोर अतुल देशमुख रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादीकडून दिलीप मोहिते मैदानात आहेत. गोऱ्हे आणि देशमुख यांच्या मतविभागणीत आपण सुटू, असा होरा मोहिते यांना वाटत आहे. 

पिंपरीमध्ये सेनेचे गौतम चाबुकस्वार सध्या विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी त्यांना आव्हान दिले आहे. येथे सिंधी समाजाची मते बनसोडे यांच्याकडे वळाली आहेत, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चाबुकस्वार अडचणीत आले आहेत. 

पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांना मतविभागणीचा फायदा मिळेल असे दिसत आहे. त्यांच्यासमोर भाजपचे विद्यमान आमदार आणि सध्याचे उमेदवार योगेश टिळेकर यांचे आव्हान असले तरीही मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांना मिळणारी मते निर्णायक ठरू शकतात. या मतदारसंघात मराठा समाजाची एकगठ्ठा मते तुपे यांना मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता आहे. 

एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीने नव्या उमेदीने पावले टाकली असली आणि वातावरण निर्मिती केली असली तरी, जर भाजपने कमळावर निवडणूक नेली. तर, अवघड होऊ शकते अन्यथा सध्या तरी राष्ट्रवादीचे अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्या बरोबरच आणखी 5 आमदार निवडून येतील, असे वातावरण निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP seats may be increased in Pune District