‘आउटगोइंग’मुळे राष्ट्रवादीची पीछेहाट

सलील उरुणकर - @salilurunkar  
रविवार, 5 मार्च 2017

तीन सदस्य असलेल्या ३७ क्रमांकाच्या अप्पर - सुपर इंदिरानगर या प्रभागात थेट लढत झाली, ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची चलती असलेल्या या भागामध्ये ‘आउटगोइंग’मुळे पक्षाला फटका बसला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनीही राष्ट्रवादीच्या बरोबरीने मते घेतल्याचे दिसते. या प्रभागामध्ये १८७१ मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायाचा वापर केला आहे. 

तीन सदस्य असलेल्या ३७ क्रमांकाच्या अप्पर - सुपर इंदिरानगर या प्रभागात थेट लढत झाली, ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची चलती असलेल्या या भागामध्ये ‘आउटगोइंग’मुळे पक्षाला फटका बसला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनीही राष्ट्रवादीच्या बरोबरीने मते घेतल्याचे दिसते. या प्रभागामध्ये १८७१ मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायाचा वापर केला आहे. 

शिवसेनेच्या माजी नगरसेविका दीपाली ओसवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेले पिंटू ऊर्फ दिनेश धाडवे यांच्या जुन्या प्रभागातील बहुतांश भाग या नव्या प्रभागामध्ये आला आहे. धाडवे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून त्यांच्या पत्नी रूपाली यांना भारतीय जनता पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्यामुळे या भाजपला फायदा होणार, हे निश्‍चित मानले जात होते आणि तसे घडलेही. ‘ब’ गटामधून लढणाऱ्या रूपाली धाडवे यांनी पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत आघाडीवर राहून एकूण १२,५१४ मते मिळविली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी व शिवसेनेच्या उमेदवार शारदा भोकरे यांना एकूण ५००९ मते मिळाली. तब्बल ७५०५ मतांनी धाडवे यांनी विजय नोंदविला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षाराणी कुंभार यांना २८१४, तर मनसेच्या माधुरी दारवटकर-जोशी यांना २३२६ मते मिळाली. त्या अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर राहिल्या. 

‘अ’ गटामध्येही भाजपच्या वर्षा साठे आणि शिवसेनेच्या बालिका जोगदंड यांच्यामध्ये चुरस झाली. साठे यांनी पहिल्या फेरीत घेतलेली आघाडी तोडण्याचा प्रयत्न जोगदंड यांनी केला, चौथ्या फेरीअखेर साठे यांना ८४१३ मते, तर जोगदंड यांना ६११७ मते मिळाली. साठे यांचा २२९६ मताधिक्‍याने विजय झाला. मनसेच्या कविता वाघमारे यांना ३८३३ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिंदू बसवंत यांना २८०८ मते मिळाली. 

खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या ‘क’ गटामध्ये सर्वांत चुरशीचा सामना होता तो म्हणजे शिवसेनेचे बाळा ओसवाल आणि भाजपचे गौरव घुले यांच्यामध्ये. पहिल्या फेरीमध्ये घुले यांनी ओसवाल यांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या फेरीमध्ये ओसवाल यांनी घुले यांना मागे टाकले. चौथ्या फेरीअखेर ओसवाल यांना ९८२० मते मिळाली, तर घुले यांना ८३३९ मते मिळाली. ओसवाल यांनी १४८१ मते अधिक मिळवून आपला विजय नोंदविला. मनसेचे राहुल गवळी यांनी २७७१ मते मिळविली. या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिलेला नव्हता.

Web Title: NCP setback by outgoing