राष्ट्रवादीचा अदलाबदलीचा आग्रह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांसोबत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी पुन्हा राज्यातील सर्वच जागांचा आढावा घेतला. आपल्याकडील तगड्या उमेदवारांच्या सोयीकरिता काही जागांची अदलाबदल करण्याचा राष्ट्रवादीचा आग्रह असून, त्यातील काही जागांबाबत बैठकीत प्राधान्याने चर्चा करण्यात आली.

पुणे - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांसोबत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी पुन्हा राज्यातील सर्वच जागांचा आढावा घेतला. आपल्याकडील तगड्या उमेदवारांच्या सोयीकरिता काही जागांची अदलाबदल करण्याचा राष्ट्रवादीचा आग्रह असून, त्यातील काही जागांबाबत बैठकीत प्राधान्याने चर्चा करण्यात आली. दुसरीकडे मात्र राज्यातील २८८ पैकी २२० जागांसंदर्भात एकमत झाले आहे. परंतु, काही बदल होऊ शकतात हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आर्वजून स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली. पाटील यांच्यासह अजित पवार, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते. राज्यभरातून इच्छुकांनी केलेले अर्ज, आघाडीतील जागावाटपाचे जुने सूत्र, मतदारसंघातील सद्यस्थिती, विरोधकांची ताकद, पक्षांतराचे परिणाम या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.

विधानसभेच्या बहुतांशी जागांचा निर्णय झाल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आघाडीचे चित्र स्पष्ट होईल, असे पाटील यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र सप्टेंबर उजाडला तरी जागांचा तिढा सुटलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर झालेल्या बैठकीत सर्वच जागांवरील स्थिती जाणून घेऊन चर्चा करण्यात आली. आघाडीच्या सूत्रानुसार काँग्रेसकडील मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी तयारी केली आहे. या इच्छुकांनी बैठका, कार्यक्रमांचा सपाटाही लावला आहे. त्यामुळे अशा काही जागा घेण्याची राष्ट्रवादीची रणनीती आहे.

पाटील म्हणाले, ‘‘काँग्रेस आणि मित्र पक्षांसोबत समाधानकारक चर्चा सुरू आहे. येत्या चार दिवसांत चित्र स्पष्ट होईल. पक्षाकडे आलेल्या ८१३ इच्छुकांच्या अर्जांबाबत बैठकीत माहिती देण्यात आली. काही जागांमध्ये बदल होऊ शकतो.’’

इंदापूरबाबत निर्णय नाही
इंदापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची चर्चा झालेली नाही. यासंदर्भात दोन्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील. परंतु, या जागेचा निर्णय झालेला नाही, असे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले. इंदापूरच्या जागेवरून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची 
चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP urged to replace some of the seats