तिच तिच थोबाडं बघून वीट आलाय; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मन की बात'

अमोल कविटकर
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पक्षात तिच तिच थोबाडं बघून आता लोकांना वीट आलाय. तेच नेते, त्यांचीच लोकं पदाधिकारी आणि तोचतोचपणा यामुळे लोकांना वीट आलाय, अशी 'मन की बात' राष्ट्रवादीच्या युवा संवाद कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी केली.

पुणे : "पक्षात तिच तिच थोबाडं बघून आता लोकांना वीट आलाय. तेच नेते, त्यांचीच लोकं पदाधिकारी आणि तोचतोचपणा यामुळे लोकांना वीट आलाय, अशी 'मन की बात' राष्ट्रवादीच्या युवा संवाद कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी केली.

युवा संवादच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायला आलेल्या खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यासपीठावरून संवाद साधण्याऐवजी थेट कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संवाद साधला. यावेळी डॉ. कोल्हे यांनी थेट कार्यकर्त्यांनाच त्यांच्या 'मन की बात' करायला लावली. कार्यकर्त्यांनीही मागे-पुढे न पाहता मनमोकळा संवाद साधला. यावेळी पार्थ पवार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेकांनी काढता पाय घेतला असला, तरी कार्यकर्ते अजूनही शरद पवार यांच्यासाठी मैदानात लढण्याची तयारी दर्शवत असून त्यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेत पक्षातील अंतर्गत गटबाजी, घराणेशाही आणि वेगवेगळ्या बाबींवर लक्ष वेधले. यावर डॉ. कोल्हे यांनीही कार्यकर्त्यांचे समाधान होईल आणि ऊर्जा निर्माण होईल अशी उत्तरे देत टाळ्या मिळवल्या. या संवादात कुणी त्याच-त्याच चेहऱ्यांना पुढे केले जात असल्याने लोकांना वीट आल्याचे सांगितले तर काहीही गटबाजीवर बोट ठेवत स्थानिक नेतृत्वावर निशाणा साधला.

यावर संवाद संपल्यानंतर सरकारनामाशी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, 'कार्यकर्त्यांनी त्यांची बाजू आणि म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांची बाजू समोर येत आहे. यामुळे राष्ट्रवादीकडे मैदानात लढणाऱ्या आक्रमक कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे, हे सिद्ध होत आहे'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp workers talk about new faces in party