

NDA Silver Medal Winners
esakal
प्रज्वल रामटेके
पुणे : सैनिकी गणवेशाचे आकर्षण, देशसेवेचे स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी घेतलेले अथक परिश्रम... एनडीएतील कठोर शारीरिक प्रशिक्षण, शिस्तबद्ध दिनचर्या आणि अभ्यासाचा ताण सांभाळत चार छात्रांनी शैक्षणिक गुणवत्तेतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणाला वडिलांच्या हवाई दलातील सेवेने प्रेरणा दिली, तर कोणाला कुटुंबातील सैनिकी वातावरणाने लष्कराची वाट दाखवली. एका छात्राने प्रवेश परीक्षेतील सलग तीन अपयशांनंतर चौथ्या प्रयत्नात यश मिळविले, तर दुसऱ्या छात्राच्या कुटुंबातील तिन्ही भावंडांनी संरक्षण दलाची वाट निवडली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १५१ व्या तुकडीतील या चार गुणवंत छात्रांनी शैक्षणिक अभ्यासात अव्वल स्थान मिळवत रौप्यपदक पटकाविले. पदवीप्रदान सोहळ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या यशाचा प्रवास उलगडला.