बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी अधिक पथकांची तैनाती

बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी
अधिक पथकांची तैनाती
Published on: 

नवी दिल्ली, ता. १७ (पीटीआय) : पूर, इमारती कोसळणे किंवा भूस्खलनाच्या घटनांपेक्षाही पाण्यात बुडण्याच्या दुर्घटनांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) मनुष्यबळाचा सर्वाधिक वापर होत असल्याचे समोर आले आहे. २०२३ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत एनडीआरएफच्या एकूण तैनातीपैकी सुमारे ३१ टक्के पथके बुडण्याच्या दुर्घटना रोखण्यासाठी आणि बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली होती.
‘पीटीआय’ला मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, बुडण्याच्या दुर्घटनांनंतर राष्ट्रीय कार्यक्रम, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, क्रीडा स्पर्धा आणि संसदेच्या कामकाजासाठी १८.४२ टक्के, तर पूरस्थितीतील बचाव आणि मदतकार्यासाठी १७ टक्के पथके तैनात करण्यात आली होती.
‘‘पूर, भूस्खलन किंवा भूकंपाच्या घटनांप्रमाणे बुडण्याच्या दुर्घटनांची फारशी चर्चा होत नाही. मात्र, देशात दररोज १०० हून अधिक जणांचा पाण्यात बुडून मृत्यू होतो. नद्या, तलाव, धबधबे आणि अन्य जलस्रोतांच्या ठिकाणी अपघात व जीवितहानी रोखण्यासाठी दरवर्षी एनडीआरएफची सर्वाधिक पथके तैनात केली जातात,’’ अशी माहिती एनडीआरएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. मात्र, या तैनातीपैकी बहुतांश तैनाती मेळे, कुंभमेळा यांसारख्या आधीच नियोजित असलेल्या कार्यक्रमांच्या ठिकाणी केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. अपघाताने किंवा आत्महत्येमुळे होणारे पाण्यात बुडून मृत्यू बहुतांश वेळा बचावासाठी कोणीही उपस्थित नसताना होतात, असेही त्यांनी सांगितले.


एनडीआरएफच्या पथकांची तैनाती (२०२३-२५)
कामाचे स्वरूप पथके टक्केवारी
बुडण्याच्या दुर्घटना १,६२२ ३०.८६%
राष्ट्रीय कार्यक्रम, क्रीडा, व्हीआयपी व संसद ९६८ १८.४२%
पुरातीलबचाव व पावसाळ्यापूर्वीची सज्जता ८९४ १७.०१%
अन्य कामे १,७७२ ३३.७१%
एकूण ५,२५६ १००%


पाण्यात बुडून मृत्यूच्या घटना
वर्ष मृत्यूंची संख्या एकूण अपघाती मृत्यूंतील प्रमाण
२०२३ ३७,७३८ ८.६%
२०२४ ४०,०४४ ८.७%

दोन वर्षांतील वाढ :
- मृत्यूंची संख्या : २,३०६
- वाढीचे प्रमाण : ६.११%


जनजागृतीची आवश्‍यकता
एनडीआरएफच्या अन्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बुडून होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे दोन तृतीयांश मृत्यू प्रशासनाने निश्चित केलेल्या स्नानासाठीच्या घाटांवर किंवा नदीकिनारी होतात. अशा दुर्घटना रोखण्यासाठी जनजागृती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना वाढविण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.