Education Policy : " ‘मनुष्यबळ’ला भाव, ‘कुशल’चा मात्र अभाव ; उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांनुसार अभ्यासक्रमनिर्मितीची गरज

मोठ-मोठ्या पदव्या घेऊन लाखो विद्यार्थी दरवर्षी शिक्षण संस्थांमधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात. परंतु, त्यातील काही मोजक्यांनाच चांगल्या पगाराची नोकरी लागते. खरंतर, उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेता, त्याला पूरक अभ्यासक्रमाची आखणी उच्चशिक्षण व्यवस्थेत होत नसल्याने कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करणे अशक्य होते.
Education Policy
Education Policy sakal

पुणे : मोठ-मोठ्या पदव्या घेऊन लाखो विद्यार्थी दरवर्षी शिक्षण संस्थांमधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात. परंतु, त्यातील काही मोजक्यांनाच चांगल्या पगाराची नोकरी लागते. खरंतर, उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेता, त्याला पूरक अभ्यासक्रमाची आखणी उच्चशिक्षण व्यवस्थेत होत नसल्याने कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करणे अशक्य होते. परिणामी, नोकरीच्या हजारो जागा उपलब्ध असूनही विद्यार्थ्यांना ‘प्लेसमेंट’मध्ये नोकरी मिळत नसल्याचे वास्तव असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) ३० टक्के विद्यार्थी अद्याप कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली. अर्थात, त्यानंतर लगेचच ‘आयआयटी मुंबई’ने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील केवळ ६.१ टक्केच विद्यार्थी नोकरी शोधत असल्याचे ‘एक्स’च्या माध्यमातून स्पष्ट केले. परंतु, यानिमित्ताने दरवर्षी उच्च शिक्षण घेऊन विद्यापीठे, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांमधून नोकरीच्या शोधात बाहेर पडणारे लाखो विद्यार्थी आणि त्यांना उपलब्ध न होणाऱ्या नोकरीच्या संधी यावर शिक्षण क्षेत्रात बराच ऊहापोह झाला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील प्रामुख्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांतील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये २० ते ३० टक्क्यांनी घट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील आर्थिक मंदीसारखी स्थिती, निवडणुका, अशा घटकांचा परिणाम कंपन्यांच्या नोकरभरतीवर झाला आहे. परंतु, माहिती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात सर्वाधिक नोकरीच्या संधी आहेत, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

वर्गात दिल्या जाणाऱ्या शिक्षणापेक्षा अनुभवावर आधारित शिक्षणाला येत्या काळात प्राधान्य देण्याची गरज आहे. ४० टक्के सैद्धांतिक अभ्यासक्रम आणि ६० टक्के औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित अभ्यासक्रम असायला हवा. उद्योगक्षेत्रातील मनुष्यबळाच्या अपेक्षा समजून घेऊन, त्यादृष्टीने मुलांना तयार करणारे अभ्यासक्रम विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांनी स्वीकारायला हवेत. अनेक प्रगत देशांमध्ये उद्योगांना आवश्यक अभ्यासनिर्मिती हे राष्ट्रीय धोरणातच समाविष्ट केलेले आहे. काही देशांमध्ये कोणत्या क्षेत्रात संशोधनाची गरज आहे आणि कशात संशोधन करायचे, हे देखील धोरणात स्पष्ट केले आहे. त्यादृष्टीने आपणही पावले उचलायला हवीत.

- डॉ. अपूर्वा पालकर, कुलगुरू,

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ

जगात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने बदलत आहे. या वेगाला पूरक कौशल्य आणि शिक्षण सध्याच्या शिक्षण पद्धतीतून आपण देऊ शकत नाही, हे मान्य करायला हवे. बदलत्या जगाचा वेग पकडण्यासाठी अभ्यासक्रमातही त्या अनुषंगाने सातत्याने बदल करणे आवश्यक आहे, तरच उद्योगांना आवश्यक असणारे मनुष्यबळ मिळू शकेल. आजकाल मुलांना चांगल्या नोकऱ्या नाहीत, म्हणून ते बाहेरच्या देशात पळत आहेत. देशात कुशल मनुष्यबळनिर्मितीसाठी आणि शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने धोरणात्मक बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने उद्योगांच्या गरजा आणि विद्यार्थीसंख्या लक्षात घेऊन सांख्यिकी माहिती संकलित करावी. त्या माहितीचे विश्‍लेषण करून नोकरीच्या संभाव्य संधी पाहून त्याला पूरक अभ्यासक्रमाची निर्मिती होणे महत्त्वाचे ठरेल.

- डॉ. अरुण अडसूळ, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

प्लेसमेंट न होण्याची कारणे

  • नोकरीच्या संभाव्य संधी कमी होताहेत

  • उद्योग क्षेत्रातील अनुभवावर आधारित ज्ञानाची कमतरता

  • उच्चशिक्षणातील कालबाह्य होणारा अभ्यासक्रम

  • उद्योग समूहांच्या गरजा लक्षात न घेता राबविण्यात येणारे अभ्यासक्रम

नोकरीच्या संधी मिळविण्यासाठी हे आवश्यक

  • उद्योग क्षेत्रातील उपलब्ध संधी पाहून अभ्यासक्रमनिर्मिती व्हावी

  • उद्योगातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित अभ्यासक्रम हवा

  • बदलांच्या अनुषंगाने अभ्यासक्रमात बदल करण्यात यावा

  • शिक्षणातून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे

  • उच्चशिक्षणातून विचार कौशल्य विकसित होणे गरजेचे

  • विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय ज्ञान असावे

  • दोन-तीन भाषांचे कौशल्य आत्मसात करावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com