esakal | सध्याच्या काळात टिकून राहण्यासाठी मुक्त शिक्षणाची गरज : डॉ. कस्तुरीरंगन
sakal

बोलून बातमी शोधा

K-KasturiRangan

जे. आर. डी. टाटा एकमेव असे व्यक्ती आहेत जे व्यावसायिक क्षेत्रात असून, त्यांना 'भारतरत्न' ही उपाधी मिळाली आहे.

सध्याच्या काळात टिकून राहण्यासाठी मुक्त शिक्षणाची गरज : डॉ. कस्तुरीरंगन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''वर्तमानकाळात कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. शिक्षण क्षेत्रात कलेचे ज्ञान शिकविण्याबरोबरच मुक्त शिक्षणाची गरज आहे,'' असे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले. 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रिकल अँड इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर्सच्या पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युरेका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, शास्त्रज्ञ डॉ. सुनील मुखी, सूर्यकांत कुलकर्णी, दीनानाथ खोळकर, राहुल कराड, डॉ. एस. परशुरामन आदी या वेळी उपस्थित होते. 

डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले, ''भाषा ही प्रगतीचे द्वार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळात जास्तीत जास्त भाषा अवगत करून आपले ज्ञान वाढवावे. वर्तमानकाळातील ज्या पद्धतीचे शिक्षण आहे, त्यात हव्या त्या प्रमाणात रोजगार मिळत नाही. अशा वेळेस खासगी शैक्षणिक संस्थांनी सरकारवर अवलंबून न राहता नवीन प्रयोग करावेत. भारताने अंतराळ क्षेत्रात चांद्रयान आणि मंगळयानच्या माध्यमातून केलेले कार्य जगासमोर आहे. ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे वळविण्यासाठी त्यांना सर्वंकष शिक्षण दिले पाहिजे.'' 

कुलकर्णी म्हणाले, ''देशातील बहुतांश लोकसंख्या ही खेड्यातील असल्याने कृषी क्षेत्राशी निगडित पाठ्यक्रम शहरी व ग्रामीण भागात सुरू करावेत.'' 

डॉ. मुखी म्हणाले, ''ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान म्हणजे काय, हे समजावून सांगणे काळाची गरज आहे. विज्ञान समजणे म्हणजे प्रकृतीच्या नियमांना समजणे, स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि विज्ञानाच्या माध्यमातून जे काही निर्मित करू त्याचा फायदा समाजाला करणे गरजेचे आहे.'' डॉ. व्ही. व्ही. शेटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुचित्रा खोजे व डॉ. नेहा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. 

विद्यार्थ्यांनी शिकण्याची वृत्ती ठेवावी 
''जे. आर. डी. टाटा एकमेव असे व्यक्ती आहेत जे व्यावसायिक क्षेत्रात असून, त्यांना 'भारतरत्न' ही उपाधी मिळाली आहे. त्यांच्या मतानुसार देशाला सुपर पॉवरपेक्षा हॅपी भारत बनवावे. विद्यार्थ्यांनी सदैव शिकण्याची प्रवृत्ती ठेवावी. इंजिनिअरिंग क्षेत्रातसुध्दा कलेचा वापर मोठ्या प्रमाणात करावा,'' असे खोळकर यांनी सांगितले.

loading image
go to top