स्वसंरक्षणासाठी शालेय मुलींना कराटे आणि ज्युदोचे प्रशिक्षण देण्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karate Training

पुणे शहर व जिल्ह्यात निर्भया केससारखी प्रकरणे आणि बलात्काराचे प्रकार सातत्याने वाढत आहेत.

स्वसंरक्षणासाठी शालेय मुलींना कराटे आणि ज्युदोचे प्रशिक्षण देण्याची गरज

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यात निर्भया केससारखी प्रकरणे आणि बलात्काराचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. हे रोखण्यासाठी शालेय मुलींचा भोळेपणा आणि भित्रा स्वभाव दूर केला पाहिजे. शिवाय लैंगिक अत्याचार प्रतिबंधासाठी आणि स्वसंरक्षणासाठी शालेय मुलींना कराटे आणि ज्युदोचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत पुण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी शनिवारी (ता. २३) एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, विधी प्राधिकरण पुणे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शहर व जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी शालेय मुलीवरील संभाव्य लैंगिक अत्याचार प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे शहराचे सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, उपपरिवहन अधिकारी संजीव भोर, सहायक महाव्यवस्थापक नारायण लाड, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनंदा वाखारे, पोलिस उपनिरीक्षक विद्या राऊत, संजय ठाणगे आदी उपस्थित होते.

देशमुख पुढे म्हणाले, ‘लैंगिक अत्याचार प्रतिबंधाबाबतची जागृती शालेय मुला-मुलींमध्ये झाली पाहिजे. सध्या मुला-मुलींच्या मनावर दृकश्राव्य माध्यमांचे दुष्परिणाम जास्त होत आहेत. त्यापासून लहान मुले कसे दूर राहतील, हे पाहिले पाहिजे. लैंगिक छळ झाल्यास, त्याबाबत न भिता पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली पाहिजे. शाळेमध्ये विश्‍वासदर्शक वातावरण निर्माण झाले पाहिजे. तसेच शाळेने मूल्य शिक्षणावर भर देवून, याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. अशा प्रकारचे अत्याचार झाल्यास न्याय व्यवस्था व पोलिस प्रशासन मदत करत असतेच. परंतु यासाठी समाजानेही खऱ्या अर्थाने पुढाकार घेऊन, यामध्ये मदत केली पाहिजे.’

या कार्यशाळेत विद्यार्थिनीवर होणारे लैंगिक अत्याचार, त्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, पोक्सो कायदा, तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न शाळा, विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना व परिवहन समिती कामकाज, हर घर झेंडा उपक्रमांतर्गत ध्वजसंहिता जाणीवजागृती आदी विषयांवर मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत शहर, जिल्ह्यातील सुमारे ९५० शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी स्वागत केले. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रणिता कुमावत यांनी तज्ज्ञांचा परिचय करून दिला. शिवाजी कामथे यांनी सूत्रसंचालन केले. पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप यांनी आभार मानले.

पोलिस काका, पोलिस दीदीची टीम - कर्णिक

शहरातील १८ वर्षांखालील बालकांचे लैंगिक छळ आणि शोषण यापासून संरक्षण करण्यासाठी पोक्सो कायद्याच्या माध्यमातून कायदेशीर तरतूद मजबूत करण्यात आलेली आहे. या कायद्याबाबत जागृती करण्यासाठी ही ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली आहे. सध्या लहान मुलां-मुलींची सुरक्षितता महत्त्वाची आहे. जर शाळेमध्ये मुला-मुलीच्या सुरक्षिततेबाबत काही अनुचित प्रकार घडला तर, तत्काळ जवळच्या पोलिस स्टेशनला माहिती देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात मुला-मुलींच्या मदतीसाठी पोलिस काका व पोलिस दीदी यांची टीम तयार करण्यात आली असल्याचे पुणे शहराचे सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Need To Train School Girls In Karate And Judo For Self Defence Sanjay Deshmukh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..