देशात दोन हजार विद्यापीठांची गरज - डॉ. शां. ब. मुजुमदार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

केवळ शिक्षणामुळे अमेरिका हे जगात महासत्ता बनले आहे. कारण, सत्ताकेंद्राचा प्रवास हा श्रीमंतीकडून शिक्षणाकडे सुरू झाला आहे. यासाठी भारतात आणखी दोन हजार विद्यापीठे सुरू होण्याची गरज असल्याचे मत सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी मंगळवारी (ता. ४) येथे व्यक्त केले.

पुणे - केवळ शिक्षणामुळे अमेरिका हे जगात महासत्ता बनले आहे. कारण, सत्ताकेंद्राचा प्रवास हा श्रीमंतीकडून शिक्षणाकडे सुरू झाला आहे. यासाठी भारतात आणखी दोन हजार विद्यापीठे सुरू होण्याची गरज असल्याचे मत सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी मंगळवारी (ता. ४) येथे व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साथी किशोर पवार प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘शिक्षण गौरवभूषण’ पुरस्कार मुजुमदार यांच्या हस्ते मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचे अध्यक्ष समीरभाई शांतिलालजी सोमय्या यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर, उपाध्यक्ष अंकुश काकडे, सचिव वंदना पवार, डॉ. मंगलप्रभा देडगे, अमृताबेन सोमय्या आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘‘शारीरिक आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर सत्ताकेंद्र ठरत असे. त्यातूनच भारतात राजे, महाराजांची सत्ता होती. कारण, राजांकडे शारीरिक आणि आर्थिक ताकदीवर सत्ता असे. आज काळ बदलला आहे. सत्ताकेंद्रासाठी आता नॉलेजची (ज्ञान) गरज आहे. यासाठी चांगल्या आणि दर्जेदार विद्यापीठांची निर्मिती होणे आवश्‍यक आहे. आजघडीला भारतात सुमारे एक हजार विद्यापीठे, ५० हजार महाविद्यालये आहेत. या सर्व विद्यापीठांमध्ये मिळून पाच कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशात आणखी दोन हजार विद्यापीठांची गरज आहे.’’ पुरस्कारार्थी समीरभाई सोमय्या, प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण ठाकूर यांचे भाषण झाले. ॲड. संतोष म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. वंदना पवार यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The need of two thousand universities in the country