esakal | लोकसाहित्य समितीचे पुनरुज्जीवन करणार - डॉ. गोऱ्हे 
sakal

बोलून बातमी शोधा

neelam-gorhe

""लोकसाहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. हा ठेवा जतन करण्यासाठी लोकसाहित्य समितीचे पुनरुज्जीवन करण्याबाबत निर्देश देणार आहे,'' असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी येथे सांगितले. 

लोकसाहित्य समितीचे पुनरुज्जीवन करणार - डॉ. गोऱ्हे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ""लोकसाहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. हा ठेवा जतन करण्यासाठी लोकसाहित्य समितीचे पुनरुज्जीवन करण्याबाबत निर्देश देणार आहे,'' असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी येथे सांगितले. 

लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित "लोकसाहित्य संमेलन'मध्ये त्या बोलत होत्या. लोकरंग सांस्कृतिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. महापौर मुक्ता टिळक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कुमुदिनी पवार, विजयामाला कदम, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, शैला खांडगे, मिलिंद लेले आणि योगेश मोकाटे या वेळी उपस्थित होते. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नगरसेवक दिलीप वेडेपाटील होते. 

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ""महाराष्ट्राला लोकसाहित्याची फार मोठी परंपरा आहे. विविध गीते, पोवाडे, वाद्ये या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याचे ऐतिहासिक कार्य लोकसाहित्याने केले आहे. यात डॉ. बाबर यांचा वाटा मोठा आहे. लोकसाहित्यविषयक राज्य सरकारची समिती गेल्या काही वर्षांपासून कार्यरत नाही. या समितीचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. त्यातून लोकसाहित्याला चालना मिळेलच; पण नवीन पिढीशी नाळ जोडली जाईल.'' 

""लोकसाहित्य जतन करण्यासाठी डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने राज्यातील विद्यापीठांमध्ये लोकसाहित्याची अध्यासने स्थापन झाली पाहिजेत,'' असेही त्यांनी सांगितले. 

डॉ. ढेरे म्हणाल्या, ""वेगळ्या दृष्टिकोनातून लोकसाहित्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यापीठांमध्ये अध्यासने स्थापन झाली पाहिजेत. त्यातून ग्रामीण भागातील लोकसाहित्याचे संचित अभ्यासण्याची नवी दृष्टी मिळेल. लोकपरंपरा हे सर्वांचे धन आहे.'' 

या वेळी कुमुदिनी पवार यांनी डॉ. बाबर यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. वेडेपाटील यांनी प्रास्ताविक केले. भिडे यांनी संमेलनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पायगुडे यांनी केले. प्रकाश खांडगे यांनी आभार मानले. 

loading image
go to top