पालिकेचा हातोडा फुक्कटच!

ब्रिजमोहन पाटील  
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

धोकादायक वाडे, अनधिकृत बांधकामे उतरविण्यापोटी महापालिका संबंधित जागामालकाकडून शुल्क वसूल करते. मात्र, बांधकाम व घरपाडी विभागाच्या अनास्थेमुळे जागामालकांकडे ११ कोटी ४३ लाख रुपये थकीत आहेत. या कारवाईसाठी महापालिका वर्षाला चार कोटी रुपये खर्च करीत आहे. 

पुणे - धोकादायक वाडे, अनधिकृत बांधकामे उतरविण्यापोटी महापालिका संबंधित जागामालकाकडून शुल्क वसूल करते. मात्र, बांधकाम व घरपाडी विभागाच्या अनास्थेमुळे जागामालकांकडे ११ कोटी ४३ लाख रुपये थकीत आहेत. या कारवाईसाठी महापालिका वर्षाला चार कोटी रुपये खर्च करीत आहे. 

महापालिकेने २४ वर्षांत २० हजार ९५० ठिकाणची बांधकामे पाडली. त्यापोटी केवळ १ कोटी ५३ लाख रुपये शुल्क जमा झाले आहे. अनेक ठिकाणी तर जुन्या इमारती पडून नव्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. पण, अद्याप ११ कोटी ४३ लाख रुपये शुल्क थकीत आहे.

दरवर्षी धोकादायक वाडे घरपाडी विभागाकडून पाडले जातात. त्याचप्रमाणे अनधिकृत इमारती, इमारतींच्या साईड मार्जीन, फ्रंट मार्जीनमधील बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून नोटिसा बजावल्या जातात. जागामालकाने स्वतःहून अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण काढून न घेतल्यास पुढील कारवाईसाठी बांधकाम विभागाकडून घरपाडी विभागाची मदत घेतली जाते. कारवाईसाठी घरपाडी विभागाकडून जेवढे मनुष्यबळ व साहित्य वापरले जाते, त्यानुसार बांधकाम विभागाला बिल सादर केले जाते. बांधकाम विभागाकडून टपालाद्वारे जागामालकाला बिल पाठविले जाते. मात्र, पुढे पाठपुरावा न केल्यामुळे वसुली होत नाही.

इमारत पाडल्यानंतर शुल्क वसूल होणे गरजेचे आहे. यासाठी हे शुल्क मिळकतकरातून वसूल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच, इतर पर्यायांचीही विचार करून थकबाकी वसूल करण्यात येईल. 
- माधव जगताप, उपायुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neglecting the collection of fees after the demolition of a dangerous castle