आपले सरकार सेवा केंद्र

आपले सरकार सेवा केंद्र
Published on

परीक्षेच्या दिव्यानंतर सेवा केंद्र
जिल्ह्यात २ हजार ३२० नवीन केंद्र
अहिल्यानगर, ता. २४ ः राज्य सरकारच्या कार्यालयांच्या सेवा-सुविधांसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ हे एक महत्त्वाचे डिजिटल केंद्र आहे. जिल्ह्यात दोन हजार आपले सरकार सेवा केंद्र दिले जाणार आहेत. या सेवा केंद्रासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे दिव्य पार केल्यानंतर सेवा केंद्र मिळणार आहे.
राज्य सरकारने नागरिकांना विविध दाखले त्यांना रहात असलेल्या भागात उपलब्ध होण्यासाठी सेतू केंद्र सुरू केले. नागरिकांनी आवश्‍यक ती कागदपत्रे सेतू केंद्रांत दिल्यानंतर सेतू चालक ही कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर करतात. या कागदपत्रांची तपासणी होऊन सेतू कार्यालयातून प्रमाणपत्र दिले जात होते. नागरिकांच्या वेळेची आणि पैशांची बचत होण्याच्या उदात्त हेतूने ही सुविधा सुरू करण्यात आली. केंद्र शासनाने काही योजनांसाठी स्थानिक पातळीवर आधार केंद्र सुरू केले. शासनाच्या इतर विभागांच्या सुविधांसाठी महा-ई सेवा केंद्र सुरू करण्यात आले. आधार केंद्र हे केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली आहेत. सेतू आणि महा-ई-सेवा केंद्र राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली आहेत. सेतू आणि महा-ई-सेवा केंद्रांचे एकत्रीकरण करून ‘आपले सरकार सेवा केंद्र’ असे नामांतरण करण्यात आले.
महसूल विभागाने मंजुरी दिलेले ६४९, तर जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलेले १ हजार ३२० केंद्र आहेत. जिल्ह्यात एकूण १ हजार ९६९ सेवा केंद्र कार्यरत आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून नव्याने आपले सरकार केंद्र देण्याची प्रक्रिया रखडली होती. कोरोना साथ, लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर आचारसंहितेमुळे आपले सेवा केंद्राचे नव्याने वाटप प्रक्रिया रखडली होती.
लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांच्या ते रहात असलेल्या भागात आपले सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा, सुविधा मिळण्यासाठी २ हजार ३२० केंद्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
--------------
चौकट- एक
सेवा केंद्रांसाठी उमेदवाराची पात्रता
किमान बारावी पास असावी
शासनमान्य संस्थेकडून एमएससीआयटी अभ्यासक्रम पूर्ण असावा
अर्जदाराकडे आधार आणि पॅन कार्ड आवश्यक
अर्जदारास मराठी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान आवश्यक
-----------
चौकट- दोन
निवडीचे निकष
कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास -३० गुण
कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास- २५ गुण
सीएससी केंद्र असल्यास - २५ गुण
समितीकडील मुलाखतीस -२० गुण
------------
चौकट-तीन
समिती गुणांची विभागणी
तांत्रिक ज्ञान असल्यास-६ गुण
लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ चे ज्ञान असल्यास- ४ गुण
सामान्य ज्ञान, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव असल्यास- १० गुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com