पुरंदरजवळ सापडला नवीन किल्ला; दुर्गप्रेमींमध्ये उत्साह

रोहित हरिप
शनिवार, 19 मे 2018

पुण्यात आल्यावर त्याने डॉ. सचिन जोशी यांची भेट घेऊन याबद्दल सांगितले असता जोशी यांनीही या शोधमोहीमेत सहभागी होत पुरातत्वीय दृष्टिकोनातून ढवळगडाचा शोध घेण्याचे ठरवले. दोघांनी पुन्हा एकदा या किल्ल्यास भेट देऊन व सर्व उपलब्ध अवशेषांची मोजमापे घेऊन तसेच त्यांची शास्त्रशुद्ध रेखाटने बनवली.

पुणे : ऐतिहासिक दुर्ग पुरंदरच्या परिसरातील भुलेश्वर डोंगररांगेवर वसलेल्या व आत्तापर्यंत प्रकाशात न आलेल्या "ढवळगड" या किल्ल्याची स्थाननिश्चिती करण्यात पुण्यातील ओंकार ओक या गिर्यारोहकाला यश आले असून या संपूर्ण कार्यात त्याला डॉ. सचिन जोशी या पुण्यातील इतिहास अभ्यासकाचे बहुमोल योगदान लाभले आहे. या शोधाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या यादीत एका नवीन किल्ल्याची भर पडल्याने दुर्गप्रेमींमध्ये अत्यंत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.

पुरंदर तालुक्यातील आंबळे गावाजवळ ढवळगड वसलेला असून गडावरील ढवळेश्वर मंदिर स्थानिक ग्रामस्थांमध्ये सुप्रसिद्ध आहे. गडावर जाण्यासाठी 2 मार्ग असून त्यातला पहिला मार्ग सासवडहुन - वनपुरी - सिंगापूर- पारगाव चौफुला- वाघापूर- आंबळे असा असून आंबळे गावातून गडाच्या अर्ध्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. दुसरा मार्ग पुणे - सोलापूर मार्गावरील उरुळीकांचन येथून असून डाळिंब गावमार्गे चालत तासाभरात गडाचा माथा गाठता येतो.इतिहास संशोधक कृष्णाजी वामन पुरंदरे यांच्या "किल्ले पुरंदर" या अस्सल संदर्भपुस्तकात ढवळगडचा उल्लेख आलेला असून त्याचे स्थान भुलेश्वर डोंगररांगेत असल्याचे नमूद केले आहे. स्थानिक गावकऱ्यांना जरी हा ढवळगड माहित असला तरी त्याच्यावर किल्ला या दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध संशोधन न झाल्याने हा किल्ला गुलदस्त्यातच राहिला व ट्रेकर्सच्या नकाशावर आलेला नव्हता. फेब्रुवारी महिन्यात ओंकार त्याच्या काही मित्रांबरोबर आंबळे गावाच्या परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेलेला असताना त्याला एका डोंगरावर तटबंदी आढळून आली. त्यामुळे उत्कंठा शिगेला पोहचून त्या ठिकाणी जाऊन त्याने अधिक शोध घेतला असता तटबंदी, भग्न दरवाजा, पाण्याची खोदीव टाकी,मंदिर, बुरुज, चुन्याच्या घाण्याचे अवशेष,मेटाची ठिकाणे इत्यादी अवशेष आढळून आले. पुरंदरे यांच्या पुस्तकातील उल्लेख व ढवळगडाचे स्थान तंतोतंत जुळत असल्याने तसेच गॅझेटीयरमध्येही या किल्ल्याचा कुठेही उल्लेख न आल्याने त्याने अधिक खोलात शोध घेण्याचा निर्णय घेतला.

पुण्यात आल्यावर त्याने डॉ. सचिन जोशी यांची भेट घेऊन याबद्दल सांगितले असता जोशी यांनीही या शोधमोहीमेत सहभागी होत पुरातत्वीय दृष्टिकोनातून ढवळगडाचा शोध घेण्याचे ठरवले. दोघांनी पुन्हा एकदा या किल्ल्यास भेट देऊन व सर्व उपलब्ध अवशेषांची मोजमापे घेऊन तसेच त्यांची शास्त्रशुद्ध रेखाटने बनवली. किल्ल्यावर आजमितीस तटबंदी, बुरुज, मंदिर, पाण्याची खोदीव व खांबटाकी, मेटाचे अवशेष, चुन्याच्या घाण्याचे अवशेष इत्याही ऐतिहासिक अवशेष असून किल्ला या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी इथे आढळून आल्या. त्यामुळे ढवळगड हाच ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख असलेला किल्ला असल्याचे सिद्ध होऊन त्याची स्थाननिश्चिती झाली आहे.

हे संशोधन नक्की कसं घडलं यावर आज संध्याकाळी 6.30 वाजता भारत इतिहास संशोधक मंडळात ओंकार ओक व सचिन जोशी यांचे सादरीकरण होणार आहे.

Web Title: new fort found near Purandar