

फळप्रक्रिया उद्योगांसाठी
लवकरच नवीन योजना
केंद्रीय कृषी सचिव अतिश चंद्रा ः पुरंदरमधील शेतकरी उत्पादक कंपन्यांची पाहाणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : फळप्रक्रिया उद्योगासाठी कमी व्याजदरात अधिक भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच नवीन योजना आणण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून फळप्रक्रिया उद्योगांना आवश्यक भांडवल उपलब्ध होऊन मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योग अधिक सक्षमपणे चालविता येतील, अशी माहिती केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्रा यांनी दिली.
चंद्रा यांच्यासह केंद्रीय अतिरिक्त कृषी सचिव मनिंदर कौर द्विवेदी, केंद्रीय फलोत्पादन आयुक्त प्रभातकुमार आणि ‘अपेडा’चे अध्यक्ष अभिषेक देव यांच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील विविध कृषी व फलोत्पादन आधारित प्रक्रिया उद्योगांना भेट दिली. या दौऱ्यावेळी राज्याचे कृषी उपसचिव श्रीकांत लांडगे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) उदय देशमुख, फलोत्पादन संचालक जीवन बुंदे, मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे, स्मार्ट प्रकल्पाच्या अधिकारी प्रियंका भोसले व अंकुश बर्डे, फलोत्पादन संचालक कार्यालयातील कृषी उपसंचालक संजय सूर्यवंशी, राजगुरुनगरचे उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट, पुरंदर तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांच्यासह संबंधित मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक उपस्थित होते. या वेळी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांनी प्रक्रिया उद्योगांसाठी भांडवलाची उपलब्धता, कमी व्याजदर आणि बाजारपेठेच्या संधींबाबत मागण्या मांडल्या. त्यावर चंद्रा यांनी ही माहिती दिली.
पुरंदर तालुक्यातील पुरंदर लक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली असता कंपनीचे संचालक विठ्ठल झेंडे यांनी सीताफळ व अंजीर फळबाग लागवडीचे तंत्रज्ञान, बहार व्यवस्थापन आणि झाडांची छाटणी या बाबत माहिती दिली. स्मार्ट प्रकल्पांतर्गत उभारलेल्या प्रकल्पात फळांची प्रतवारी, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेत विक्री कशा पद्धतीने केली जाते, याचे सादरीकरण करण्यात आले.
या वेळी दौंड तालुक्यातील स्मार्ट प्रकल्पांतर्गत उभारलेल्या पवित्रक फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक समीर डोंबे उपस्थित होते. त्यांनी अंजिरापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांची माहिती दिली. तसेच स्मार्ट प्रकल्पांतर्गत उभारलेल्या पुरंदर हायलँड कंपनीचे संचालक रोहन उरसळ यांनी अंजीर, पेरू आणि जांभूळ यांच्यावर प्रक्रिया करून तयार केलेल्या विविध उत्पादनांची माहिती दिली. या उत्पादनांचे देशांतर्गत तसेच परदेशातील बाजारपेठेत मार्केटिंग व विक्री कशा पद्धतीने केली जाते, या बाबतही त्यांनी माहिती दिली.
यानंतर शिष्टमंडळाने वाळुंज येथील मॅग्नेट प्रकल्पांतर्गत उभारलेल्या नितीन फुड्सला भेट दिली. कंपनीचे संचालक नितीन इंगळे यांनी विविध फळांवर प्रक्रिया करून उत्पादने तयार करणे, त्यांची साठवणूक कंपनीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये करणे या बाबत माहिती दिली. या वेळी पेरू प्रक्रियेचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. केतकावळे येथील न्यूट्री फ्रेश कंपनीला भेट देऊन परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती केंद्रीय कृषी सचिवांनी घेतली.
फोटो ओळी
पुणे ः पुरंदर तालुक्यातील वाळुंज येथील फळ प्रक्रिया उद्योगांची पाहणी करताना केंद्रीय कृषी सचिव अतिश चंद्रा, केंद्रीय अधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.