अंबोली पालीच्या नव्या प्रजातीचा शोध

नितीन चौधरी
शनिवार, 27 जुलै 2019

आणखी दोन नव्या प्रजाती
अक्षय खांडेकर यांनी आजवरच्या पाच वर्षांच्या अभ्यासात तीन सरडे, दोन सापसुरळी आणि 14 पालींच्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यांनी चिखलदरा आणि अंबा घाट परिसरातही एका पालीचा शोध लावला आहे. तसेच तमिळनाडूतील दोन, कर्नाटकमधील दोन, आंध्र प्रदेशातील दोन, हिमाचल प्रदेशातील एका पालीचा शोध लावला आहे. कोयना परिसरातही दोन प्रजातींचा शोध लागला असून, त्याबाबत अजून मान्यता मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे - पश्‍चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या अंबोली घाट परिसरात पालीच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. पुण्यातील शास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी यांच्या नावाने ती ओळखली जाणार असून, तिचे शास्त्रीय नाव हेमीडॅक्‍टिलस वरदगिरी असे असेल. अंबोलीत सापडणाऱ्या पाच ते सहा पालींमध्ये या जातीची संख्या मोठी आहे. न्यूझीलंडमधील "झू टॅक्‍सा' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात याबाबत शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

अक्षय खांडेकर, ईशान अग्रवाल, अपर्णा लाजमी आणि आर. चैतन्य यांच्या टीमने केलेल्या संशोधनातून ही प्रजाती समोर आली आहे. या पालीला पूर्वी हेमिडॅक्‍टिलस ब्रुकी या शास्त्रीय नावाने संबोधले जात होते. मात्र, संशोधनाअंती त्या आणि आताच्या प्रजातीत मोठे बदल असल्याचे जाणवले. त्यावर सुमारे वर्षभराच्या संशोधनातून ही प्रजात वेगळी असल्याचे समजले. त्यासाठी या प्रजातीच्या डीएनएचा अभ्यास करण्यात आला. पालींच्या प्रजाती ओळखण्यासाठी त्यांच्या अंगावरील खवले आणि ग्रंथी तपासल्या जातात. या नवीन पालीच्या अंगावरील खवल्यांची संख्या पूर्वीच्या जातीपेक्षा अधिक असून, नरातील ग्रंथींचे प्रमाणही जास्त असल्याचे आढळले. डीएनएच्या अभ्यासानंतर ही प्रजाती पहिल्या प्रजातीपेक्षा वेगळी असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत खांडेकर म्हणाले, ""अंबोलीत पाच ते सहा पालींच्या प्रजाती आढळतात.

ही प्रजात प्रामुख्याने भिंती, झाडे, सडे, छोटे पठार, त्यावरील दगडांमध्ये आढळते. ही निशाचर असून, रात्री आढळणाऱ्या कीटकांवर जगते. अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून पालीकडे पाहणे आवश्‍यक आहे. सध्या शेतीकामासाठी कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने पालींच्या अस्तित्वावर गदा येत आहे. त्यामुळे यावर अधिक संशोधन होऊन त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Lizard Search